मुंबई शहर कबड्डीला वैभव मिळवून देणार : आदित्य ठाकरे

370

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी वडाळा येथे होणार असून यावेळी शिवसेना पुरस्कृत कृष्णा तोडणकर गटाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. याप्रसंगी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहर कबड्डीला वैभव मिळवून देण्यासाठी जे जे शक्य होईल ते करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे मतदार व उमेदवार यांची बैठक शुक्रवारी शिवसेना भवन येथे पार पडली.

मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार यांच्या मदतीने शिवसेना पक्षाच्या अंगीकृत संघटनांची मदत घेऊन खेळाडूंसाठी व कबड्डी खेळासाठी भरीव कामगिरी करू. खेळाडूंना अव्वल दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी तसेच पुढील पाच वर्षांमध्ये कबड्डीच्या प्रसार व प्रचारासाठी प्रयत्न केले जातील, असे वचन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

मुंबई शहर कबड्डीच्या विकासासाठी शिवसेना पुरस्कृत कृष्णा तोडणकर गटातील सर्व उमेदवारांना ‘बाण’ या निशाणीसमोर मत देऊन विजयी करण्याचे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केले आहे. याप्रसंगी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, सचिव सूरज चव्हाण, उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, माजी मंत्री सचिन अहिर, पॅनेल प्रमुख कृष्णा तोडणकर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

  • शिवसेना पुरस्कृत कृष्णा तोडणकर गट (पॅनल) यांचा वचननामा शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.
  • कबड्डीसाठी इनडोअर स्टेडियम, खेळाडूंचा विमा, महापालिका आणि यासारख्या विविध आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी भरती करून संघ तयार करणार, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे स्वतःचे हक्काचे कार्यालय बनविणार, होतकरू आणि कुशल खेळाडूंना नोकरीची हमी, पाच विभागांत खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर, पंच शिबीर, प्रशिक्षकांचे शिबीर, मुंबई प्रीमियर लीग स्पर्धा सुरू करणार, खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर नामांकित रुग्णालयांशी संलग्न करून योग्य ते वैद्यकीय उपचार केले जातील, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सर्व प्रतिनिधी, मतदार व खेळाडूंना एकत्र येण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करून त्यांच्या सूचना व हरकतींवर उचित कार्यवाही करण्यात येईल.

शिवसेना पुरस्कृत कृष्णा तोडणकर गट उमेदवारांची नावे

सचिन अहिर, सिद्धेश चव्हाण, सुधीर देशमुख, शरद गावकर, मंगेश घेगडे, जयेश होरंबळे, सचिन कासारे, दीपक मसुरकर, मेघाली म्हसकर, सचिन पडवळ, संतोष पारकर, राजेश पाडावे, अंकुश पाताडे, राम पाटील, नितीन राणे, गणेश रेवणे, महेंद्र साळवी, तुकाराम साटम, महेश सावंत, दिगंबर शिरवडकर, पराग सुर्वे, कृष्णा तोडणकर, संदीप वरखेडे, संतोष विश्वेकर, सुधा येसरे.

मतदान दिनांक आणि वेळ : रविवार, 25 ऑगस्ट, वेळ – सकाळी 9 ते दुपारी 3, मतदान केंद्र : भारतीय क्रीडा मंदर, वडाळा, मुंबई – 400031, निशाणी : ‘बाण’

आपली प्रतिक्रिया द्या