
‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे ‘मातोश्री’वर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिले त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी गद्दार हा शब्दच योग्य आहे’ अशा शब्दांत शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आज बंडखोरांवर कडाडले.
आदित्य ठाकरे यांनी आज विधीमंडळात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि बंडखोरांचा समाचार घेतला. ‘मंत्र्यांना बंगले दिलेत, पण जिल्हे दिलेले नाहीत. पालकमंत्री आज गरजेचे आहेत, पण गद्दार सरकारचे फक्त स्वतःवरच लक्ष आहे जनतेवर नाही. हे सरकार स्थापन झाले तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला 42 दिवस लागले. खोके ओके हे काही झोंबण्यासारखे नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदारांवर कुणाचा अंकुश नाही’ अशी टीका त्यांनी केली. मुंबईतील प्रभाग पुनर्रचनेत कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल, कधीही निवडणुका घ्या, आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत’ असे ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या चौकशीवर भाष्य करताना ‘दिलखुलासपणे चौकशी करा, आनंद आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.





























































