वरळी खड्डेमुक्त, कचराशून्य करणार, आदित्य ठाकरे यांनी घेतली बैठक

1505

वरळी विधानसभा क्षेत्रातून प्रचंड मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आलेले शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी लवकरच कचरामुक्त, खड्डेमुक्त आणि रोगराईमुक्त करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वरळीच्या सर्वांगीण विकासासाठी आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या जी-दक्षिण विभागाचे अधिकारी आणि नगरसेवकांसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही  करण्याचे निर्देश दिले.

वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे वरळीच्या सर्वांगीण  विकासासाठी कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आमदार डॉ. नीलम गोऱहे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी वरळीत विकासकामांसदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये आठ काँक्रीटचे रस्ते, असफाल्ट मास्टिकचे रोड, प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण करणे, वाहतूक नियोजनाबरोबरच पादचारी मार्गाला प्राधान्य क 9 जंक्शन सुधारणे या कामांवर चर्चा करण्यात आली. वरळी उत्कृष्ट बनवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ही सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार काम करण्याचे निर्देश डॉ. गोऱहे यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीला उपमहापौर हेमांगी वरळीकर, सचिन अहिर, सुनील शिंदे, सहआयुक्त बर्डे, वॉर्ड अधिकारी शरद उघडे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, उपसभापती कार्यालयीन सचिव रवींद्र खेबुडकर, प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर, नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दिवसातून दोनदा कचरा उचलणार

  • ज्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर कचरा गोळा होतो तेथे दिवसातून दोनदा कचरा उचलण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या. कचरा व्यवस्थापनाबाबत रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून जेथे कचरा उचलण्यासाठी गाडय़ा जात नाहीत त्या ठिकाणी छोटय़ा गाडय़ांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • आजारांचे प्रमाण आणि रोगराई कमी करण्यासाठी महिन्यातून दोन ते तीनवेळा पालिकेतर्फे आरोग्य तपासणी करण्याची विनंती यावेळी नगरसेवकांकडून करण्यात आली.
  • फुटपाथ रोड आणि सिग्नल यंत्रणा यातून नागरिकांना चालता येऊ शकेल. याबाबत पालिकेच्या सहकार्याने डब्ल्यू.आर.आय. कंपन्यांनी यावेळी प्रात्यक्षिकेही सादर केली.
आपली प्रतिक्रिया द्या