प्रदुषणमुक्त महाराष्ट्रासाठी आदित्य ठाकरे यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त व शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा उद्देशाने शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.’जन आशीर्वाद’ यात्रेनिमित्त उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. प्लॅस्टिक व प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी विद्यर्थ्यांना संदेशही दिला.

‘जन आशीर्वाद’ यात्रेच्या दुसऱ्या टप्यात आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी नांदेड जिल्ह्याच्या दौरा केला. देगलूर, बिलोली नंतर नांदेड दक्षिण भागातील मोहनपुरा येथील महत्वाच्या 80 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. तसेच त्यांनी पिंपळगाव (निमजी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण,प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र करण्याबाबत संदेश दिला. कापडी पिशव्यांचे वाटप करून सर्वाना प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही त्यांनी केले. प्रदूषण,प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. नांदेडमधून मोहनपूरा वाहेगावकडे भूमीपूजनासाठी जात असताना त्यांनी गोवर्धन घाट पुलावर ‘माझं शहर,सुंदर शहर’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी वेगवेगळे संदेश चित्र रंगविताना दिसले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनीही त्यात सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र रेखाटले. वजिराबाद, जुना कौठा, विद्यापीठ परिसर, वाडीपाटी ,मुसलमानवाडी आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात यात्रेचे स्वागत केले. यावेळ पिंपळगाव (निमजी) येथील जि .प. शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वृक्षारोपण केले तसेच विद्यार्थ्यांसोबत बसून संवाद साधला.