भात खरेदीत कोटय़वधींचा  झोल; चार गोदामे सील

शहापुरात बनावट पावत्या तयार करून शेकडो शेतकऱयांकडून पैसे उकळले

व्यापाऱयांकडून कवडीमोल भावाने भात खरेदी होऊ नये यासाठी दरवर्षी ठिकठिकाणी आधारभूत केंद्रे सुरू केली जातात. मात्र शहापुरात चक्क भात खरेदी केंद्रातील अधिकाऱयाने बनावट पावत्या देऊन शेतकऱयांकडूनच प्रतिक्विंटल 1500 रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक दिवस लोटले तरी खात्यावर पैसे जमा होत नसल्याने आदिवासी विकास महामंडळावर धडक दिल्यावर या पावत्याच बोगस असल्याचे उघड झाले. याची गंभीर दखल घेत आदिवासी विकास महामंडळाने वेहळोलीसह चार गोदामांना सील ठोकले आहे. या कारवाईचा सुगावा लागताच झोलझाल करणाऱया केंद्रप्रमुखाने पोबारा केला.

शहापूरच्या आदिवासी विकास महामंडळाकडून डिसेंबर महिन्यापासून 11 केंद्रांतर्गत 28 कोटींचे भात खरेदी केले आहे. मात्र चरीव केंद्रातील वेहळोली गोदामात रोजंदारी तत्त्वावर काम करणारा केंद्रप्रमुख हेमंत शिंदे याने चक्क शेतकऱयांना बनावट पावत्या देऊन त्यांच्याकडून क्विंटलमागे 1500 रुपये उकळले आहेत. या प्रकरणी सहा ते सात शेतकऱयांनी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाला जाब विचारला.

असा झाला भ्रष्टाचार

भातासाठी क्विंटलमागे 2180 रुपये दर ठरला आहे. त्याचाच फायदा घेऊन सातबारा असलेल्या शेतकऱयांना बोलावून शिंदे हा त्यांना बनावट पावत्या देत होता. क्विंटलमागे 1500 रुपये उकळून शासनाने ठरवलेली 2180 रुपये रक्कम दोन दिवसांत तुमच्या खात्यात जमा होईल, अशी बतावणी तो करत होता. भात न विकता क्विंटलमागे जवळपास 700 रुपये मिळणार असल्याने अनेकांनी शिंदेला पैसे दिले, परंतु अनेक दिवस उलटले तरी खात्यावर दमडी न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱयांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात विचारणा केली असता शिंदेने दिलेल्या पावत्या बोगस असल्याचे समजले. दरम्यान दोषींवर कडक कारवाई न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन करेन, असा इशारा तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी दिला आहे.