भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्या, मोफत पार्किंग मिळवा;  महापालिकेची अनोखी योजना

796

शहरात भटक्या कुत्र्यांचा नेहमीच नागरिकांना त्रास होत असतो. त्यावर तोडगा काढणे ही तिथल्या स्थानिक महानगरपालिकेची जवाबदारी असते. परंतु साधने कमी असल्यामुळे प्रत्येक पालिकेला त्यावर उपाययोजना करणे शक्य असतेच असे नाही.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सिमला महानगरपालिकेने एक अनोखी शक्कल लढवली आहे. भटक्या कुत्र्यांना दत्तक घेतल्यास त्याबदल्यात मोफत पार्किंग आणि कचरा उचलण्याचे शुल्क माफ केले जाईल असा निर्णय तिथल्या महापालिकेने घेतला आहे. जर एखाद्या व्यक्तीने भटक्या कुत्र्याला दत्तक घेतले आणि त्याचा सांभाळ नीट केला नाही तर मग त्या व्यक्तीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचेही तिथल्या महापालिकेने ठरवले आहे.

सिमला शहरात दोन हजार भटके कुत्रे आहेत. सिमलासारख्या पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असतो. इथल्या स्थानिकांनाही या कुत्र्यांचा त्रास होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली होती. 2009 साली या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे उच्च न्यायालयानेही आदेश दिले होते. या आदेशामध्ये भटक्या कुत्र्यांना निवारा मिळून द्यावा हे काम पालिकेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

2013 साली सिमला महापालिकेने उच्च न्यायालयाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. दिलेल्या मुदतीमध्ये कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेला यश आलं नव्हतं. यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले असून तिथे ही याचिका प्रलंबित आहे.

एकीकडे न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना महापालिकेने कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. अमेरिकेतील शहरांच्या धर्तीवर महापालिकेने भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे अशी ही योजना आहे. अमेरिकेतील मिशिगन ह्युमन सोसायटी ही स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी निवारा आणि पालन पोषणाची जवाबदारी उचलली होती. त्याच धर्तीवर सिमला महानगरपालिकेने ही योजना सुरू केल्याचे महानगरपलिकेचे आयुक्त पंकज राय यांनी सांगितले.

या प्रक्रियेसाठी नागरिकांना पालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे. नागरिक आणि पालिका यांच्या करार होणार. या करारान्वये भटक्या कुत्र्याचे पालन पोषण, त्याच्या आरोग्य सुविधा देण्याचे वचन नागरिकांना द्यावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या