
शिवसेनेसाठी आज संघर्षाचा काळ असला तरी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेच्या हृदयात आहेत आणि येणाऱया निवडणुकीत महाराष्ट्रात निश्चितपणे शिवसेनेची लाट आलेली दिसेल, असा विश्वास भाजप सोडून शिवसेनेत आलेल्या अद्वय हिरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर आघात करणाऱया 40 गद्दारांना मराठी माणूस कधीही माफ करणार नाही. फुटीरांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असेही हिरे यांनी ठणकावून सांगितले.
अद्वय हिरे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना शिवसेना प्रवेशामागील कारण स्पष्ट केले आणि विविध मुद्दय़ांवर परखड मते मांडली. शिवसेनेच्या या संघर्षाच्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्यासह खंबीरपणाने लढायला हवे, असे मला वाटते आणि म्हणूनच मी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला, असे हिरे म्हणाले. जेव्हा जेव्हा शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना अधिक उजळून निघाली आहे, झेपावली आहे. आताही शिवसेनेला खूप चांगले दिवस येतील. प्रचंड सहानुभूती शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. ही लाट तुम्हाला पुढच्या निवडणुकीत दिसेल, असे त्यांनी पुढे नमूद केले.
हिरे यांचा शिवसेना प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर बोलताना हिरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. मालेगावात जो काही भाजप पक्ष होता तो माझ्यामुळे होता. आता येणाऱया काळात भाजपचे तालुक्यात अस्तित्व दिसणार नाही. तालुक्यातून पक्ष नामशेष होईल. जिल्हा परिषद आणि महापालिकेत भाजपची एकही जागा निवडून येणार नाही, असे हिरे म्हणाले.
शिवसेनेशी गद्दारी करणारे मंत्री दादा भुसे यांच्यावर हिरे यांनी तोफ डागली. मालेगाव बाह्य मतदारसंघात सातत्याने आमदार राहूनही दादा भुसे यांनी कोणतेच विधायक काम केले नाही. शेतकऱयांवर तर सातत्याने अन्यायच झाला. त्यामुळेच मला त्यांच्या विरोधात जावे लागले. केवळ शेतकऱयांसाठी मला राजकीय भूमिका बदलावी लागली, असे हिरे यांनी नमूद केले. शिवसेनेशी गद्दारी करणाऱया दादा भुसे यांना पक्षाची दारे कायमची बंद केली गेली आहेत. बरे झाले, ते शिवसेनेतून गेले म्हणून शिवसेनेत येण्याची माझी कित्येक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. आता माझा पुढचा राजकीय प्रवास शिवसेनेतच असेल, असेही हिरे यांनी सांगितले. शिवसेना हा कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष असून अशा पक्षाची साथ सोडणे शक्य नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
बकासुराला आवर घालावाच लागेल!
आमचा पालकमंत्री टक्केवारी मंत्री आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. तक्रारी झाल्या, पण काही होत नाही. शेतकऱयांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच त्रस्त आहेत. हा बकासुर नुसता खात सुटला आहे. या बकासुराला आवर घालावाच लागेल. मालेगाव टक्केवारीमुक्त करावेच लागेल. म्हणून बकासुराची लागलेली ही इडापिडा दूर होऊ दे असे साकडे मी खंडेरायाला घातले आहे, असे हिरे यांनी सांगितले.
शिवसेना वाढवणे हेच माझे टार्गेट
शिवसेनेतून 40 आमदार गेले असले तरी आमदारांना निवडून आणणारे निष्ठावंत शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत असून शिवसेना आहे तीच आहे, असे सांगताना मालेगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद आणखी वाढवण्याचे काम मला करायचे आहे. जे गद्दारी करून गेलेत त्यांना हिसका दाखवायचा आहे. संघटना अधिक भक्कम करायची आहे. त्यात मी निश्चितपणे यशस्वी होईन, असा विश्वास हिरे यांनी व्यक्त केला. माझे टार्गेट शिवसेना वाढवणे हे असून त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.


























































