हिंदुस्थानविरुद्ध रशिद खानचा हा आहे प्लॅन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भेदक लेगस्पिनने संपूर्ण क्रिकेट विश्वावर आपली छाप पाडणारा अफगाणिस्तानचा गोलंदाज रशिद खान पहिल्या कसोटीसाठी सज्ज झालाय. अफगाणिस्तानची पहिली कसोटी हिंदुस्थानविरुद्ध १४ जूनपासून बंगळुरुमध्ये सुरु होतीय. या ऐतिहासिक कसोटीमध्ये आपली छाप पाडण्यासाठी रशिदने विशेष योजना आखली आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने ही माहिती दिलीय.

‘ मी सध्या पाच वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्याचा सराव करत आहे. येत्या कसोटीत हिंदुस्थानच्या फलंदाजांना मी हे चेंडू टाकणार आहे. मी वेगवेगळ्या प्रकारची गुगली टाकतो. गुगली टाकताना बोटांच्या ऐवजी मनगटाचा वापर करतो, असे रशिदने यावेळी सांगितले.

रशिदने पुढे सांगितले की, ‘ लेगस्पिन टाकताना मी बोटाच्या पुढच्या भागाचा वापर करतो. मात्र विशेष प्रकारची गुगली टाकताना मी चेंडू बोटांच्या मागील भागात लपवतो. त्यामुळे चेंडू नेमका कुठे आहे हे समजत नाही’

‘ अफगाणिस्तानने अवघ्या १३ ते १४ वर्षात टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळवला आहे. जगभरात अफगाणिस्तानबाबत चांगले बोलले जावे अशी माझी इच्छा आहे. आमच्या देशाबद्दल बोलताना सध्या केवळ बॉम्ब आणि मृत्यूबाबत बोलले जाते. त्यामुळे मला खूप वाईट वाटते. जगात आमची ओळख क्रिकेटमुळे व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे क्रिकेट हा आमच्या संघासाठी निव्वळ खेळ नाही तर बरंच काही आहे, असे रशिदने सांगितले.