
अफगाणी भूभाग आणि हवाई हद्दीचा वारंवार भंग करणाऱ्या आणि काबूलवर बॉम्बहल्ला करणाऱया पाकिस्तानचा अफगाणिस्तानने शनिवारी रात्री सूड घेतला. अफगाणच्या तालिबानी सैन्याने अर्ध्या रात्री पर्वतीय भागांतील पाकिस्तानी चौक्यांवर जोरदार हल्ला करून त्यांच्या 25 चौक्या उद्ध्वस्त केल्या. यात पाकिस्तानचे 23 सैनिक मारले गेले. त्यामुळे दोन्ही देशांतील टेन्शन वाढले आहे.
पाकिस्तान त्यांच्या भूमीवरून आमच्याविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहे. आयएसआयची या दहशतवाद्यांना फूस आहे. हे दहशतवादी सातत्याने अफगाणी हद्दीत घुसून हिंसाचार करत आहेत. पाकिस्तानने शुक्रवारी राजधानी काबूलसह एका बाजारपेठेवर बॉम्ब टाकल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने हल्ला केला. कतार आणि सौदी अरबच्या आवाहनानंतर आम्ही ही कारवाई थांबवली, असे अफगाणिस्तानने स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या 25 चौक्या ताब्यात घेतल्याच्या व 58 सैनिक मारल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. पाकिस्तानने हा दावा फेटाळला असून केवळ 23 सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान सीमेवर दोन्ही देशांमध्ये कुरबुरी होत असतात. मात्र शनिवारी अफगाणिस्तानने केलेली कारवाई ही भविष्यातील मोठय़ा संघर्षाची नांदी ठरू शकते.
गंभीर परिणाम होतील तालिबानचा इशारा
पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील आयएसआयच्या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्यावे किंवा देशाबाहेर हाकलून द्यावे. पाकिस्तान सरकारने ही मागणी मान्य न केल्यास गंभीर परिणाम होतील. आमच्यावरील कुठलाही हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिला.