
अफगाणिस्तानात तालिबानचे खरे रूप पुन्हा जगासमोर आले असून रक्तरंजीत हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनी अफगाणी जनता मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरली. काबूलसह अनेक ठिकाणी रॅली काढत तालिबान राजवटीला विरोध केला. या वेळी तालिबान्यांनी विमानतळासह ठिकठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला, प्रचंड चेंगराचेंगरी झाली. यात 12 जण ठार झाले आहेत.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला असला तरी देशभरातून हळूहळू विरोध वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी जलालाबादमध्ये मोठय़ा प्रमाणावर तालिबान्यांना जनतेने विरोध केला. त्यात महिलाही होत्या. तालिबानी झेंडा काढून राष्ट्रध्वज लावण्यात आला. जलालाबादमध्ये तालिबान्यांच्या गोळीबारात तीन ठार, अनेक जण जखमी झाले. गुरुवारी अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिन होता. 19 ऑगस्ट 1919 रोजी ब्रिटिश राजवट जाऊन अफगाणी जनतेला स्वातंत्र्य मिळाले होते. राष्ट्रध्वज हातात घेऊन शेकडो नागरिक काबूलच्या रस्त्यांवर उतरले. काबूल विमानतळाकडे जाणाऱया गाडय़ांवरही अफगाणचा राष्ट्रध्वज होता. रॅलीमध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या. तालिबानविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी तालिबान्यांनी गोळीबार केला. जलालाबाद, कुनार, नागारहार, खोरट, पंदहार आदी ठिकाणीही मोठय़ा प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरल्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिन 19 ऑगस्ट असून तालिबान्यांना जनता विरोध करीत असल्याचे दृष्य जगाने पाहिले. मात्र अफगाणमध्ये सर्वत्र तालिबान्यांची दहशत आहे. अनेक ठिकाणी रॅलींवर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
अन्नधान्य आणि पैशाची मोठी टंचाई
अफगाणिस्तानात बहुतांशी धान्य आणि खाद्यपदार्थ इतर देशातून आयात केले जातात. तर अफगाणमधून सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ निर्यात होतात. मात्र तालिबान्यांच्या घडामोडींचा आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांबरोबरच व्यापार थांबला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील 38 दशलक्ष जनतेला अन्नधान्याच्या टंचाईचा मुकाबला करावा लागू शकतो, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. काबूलसह अनेक भागांत महागाईचा भडका उडाला आहे. दरम्यान, देशभरात मोठय़ा प्रमाणावर चलन टंचाई निर्माण झाली आहे.
विमानतळावर गर्दी कायम
तालिबान्यांनी शरियत कायद्याप्रमाणे महिलांना स्वातंत्र्य देऊ असे सांगितले असले तरी वास्तव वेगळे आहे. अफगाणिस्तानातील महिलांचा तालिबानी राजवटीवर विश्वास नाही. यापूर्वी तालिबान्यांचा क्रूर चेहरा अवघ्या जगाने पाहिला आहे. त्यामुळे देशाबाहेर जाणाऱयांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे.
गुरुवारीही काबूल विमानतळावर हजारोंची गर्दी होती. या वेळी तालिबान्यांनी गोळीबार केला. चार दिवसांत विमानतळावर गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
हिंदुस्थानसोबतचा व्यापार थांबविला
तालिबान्यांनी पाकिस्तान, चीन, इराण, रशियाबरोबरचे व्यापार संबंध सुरू ठेवताना हिंदुस्थानसोबतचा व्यापार मात्र थांबविला आहे. अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात जर्दाळू, अंजीर, पिस्ता यासह इतर सुकामेवा, डिंक, शहाजिरं, हिंग, कांद्याची आयात केली जाते. तसेच हिंदुस्थानकडून अफगाणिस्तानला साखर, चहा, कॉफी, कपडे, औषधे, वीज उपकरणे, संगणक आदी निर्यात केले जाते. दोन्ही देशांमध्ये दरवर्षी सुमारे 38 हजार टन मालाचा व्यापार होतो.





























































