अफगाणिस्तानात तालिबान्यांचा हैदोस; हिंदुस्थानच्या दोन दूतावासांवर हल्ला… तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवणाऱया तालिबानचा दहशतवादी हैदोस सुरूच असून कंदहार आणि हेरात येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासांवर हल्ला करीत तोडफोड केली. दूतावासांमधील महत्त्वाची कागदपत्रे चोरली आणि पार्किंगमधील गाडय़ा घेऊन दहशतवादी पळाले. दरम्यान, अफगाण नागरिकांचा तालिबान्यांविरुद्धचा आक्रोश कायम आहे. सात दिवसांनंतरही देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर हजारो अफगाणी नागरिक गर्दी करीत आहेत.

बंदुकीच्या जोरावर तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. सुरुवातीला जगापुढे आपली भूमिका ‘सौम्य’ असल्याचा प्रचार तालिबान्यांनी केला असला तरी त्यांचा ‘बुरखा’ दोन दिवसांपूर्वीच फाडला गेला आहे. तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तानबाहेर जाण्यासाठी हजारो नागरिकांची काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सात दिवसांनंतरही गर्दी कायम आहे. हे विमानतळ सध्या अमेरिकन लष्कराच्या ताब्यात असून 5200 जवानांची सुरक्षा तैनात आहे. अमेरिकन लष्कराच्या देखरेखीखालीच येथे विमानांची ये-जा होत आहे. अनेक देशांनी आपले दूतावास बंद करून कर्मचाऱयांना मायदेशी नेले. मात्र मोठय़ा प्रमाणावर अफगाणी नागरिकांना देश सोडायचा आहे. त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. या नागरिकांना अमेरिकेकडून एअरलिफ्ट करून कतार आणि अन्य देशांमध्ये हलवले जात आहे.

अमेरिकेने सात हजार जणांना अफगाणबाहेर सुरक्षित स्थळी हलवले

14 ऑगस्टपासून अमेरिकेने सात हजार जणांना काबूल येथून एअरलिफ्ट केले. सी-17 एस या विमानाने गेल्या 24 तासांत 12 फेऱयांमध्ये दोन हजार जणांना सुरक्षित स्थळी हालवले, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय प्रवक्ते बेड प्रिन्स यांनी दिली.

तालिबान्यांचे नाटक उघड

तीन दिवसांपूर्वी हिंदुस्थानने काबूल येथील दूतावास बंद करून राजदूतांसह सर्व कर्मचाऱयांना मायदेशी परत आणले. त्याच वेळी कंदहार आणि हेरात येथील वाणिज्य दूतावासही हिंदुस्थानने बंद केले आहेत. मात्र गुरुवारी तालिबानचा राजकीय युनिटचा म्होरक्या अब्बास याने हिंदुस्थानने आपले दूतावास बंद करू नये, असा निरोप काबूल आणि दिल्लीत पोहचविला. परंतु दुसऱयाच दिवशी तालिबानी दहशतवाद्यांचे हे नाटक उघड झाले.

कंदहार आणि हेरात येथे हिंदुस्थानी वाणिज्य दूतावास बंद आहेत. त्यात तालिबानी दहशतवादी घुसले आणि तोडफोड करीत हैदोस घातला. महत्त्वाची कागदपत्रे चोरली, दूतावासातील कार पळविल्या असे वृत्त आहे. यात हिंदुस्थानच्या दूतावासाचे किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समजली नाही.

तालिबानचा म्होरक्या पाकिस्तानात

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवून सात दिवस झाले तरी तालिबानचा म्होरक्या हैबतुल्लाह अखुंदजादा जगासमोर आलेला नाही. तो कुठे आहे याची माहिती आता विदेशी गुप्तचर यंत्रणांनी हिंदुस्थानला दिल्याचे समजते. हैबतुल्लाह अखुंदजादा पाकिस्तानात आहे. पाकिस्तानी सैन्याच्या संरक्षणात तो असल्याचे वृत्त आहे. काबूलच्या राष्ट्रपती भवनावर कब्जा मिळविल्यानंतर इतर तालिबानी नेत्यांची छायाचित्रे जगासमोर आली. तालिबानचा म्होरक्या हैबतुल्लाह अखुंदजादा मात्र जगापुढे आलेला नाही. ईद-उल-फितरच्या वेळी मे महिन्यात तो शेवटचा व्हिडीओत दिसला होता. त्यानंतर तो गायब आहे. हैबतुल्लाह अखुंदजादा पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असून, गेल्या सहा महिन्यांपासून तालिबानच्या इतर म्होरक्यांनी आणि इतरांनी त्याला बघितलेले नाही, अशी माहिती विदेशी गुप्तचर यंत्रणांनी हिंदुस्थानला दिली आहे.

जयशंकर दौरा अर्धा सोडून परतले

संयुक्त राष्ट्रसंघात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी दहशतवादाविरुद्ध भुमिका मांडली. दहशतवादाला कोणत्याही धर्म, राष्ट्र, सभ्यता आणि वांशिक गटाशी जोडले जाऊ नये. सर्व स्वरूपाच्या दहशतवादाचा निषेध केला पाहिजे असे जयशंकर म्हणाले. संयुक्त राष्ट्रातील भाषणानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर मेक्सिको, पनामा आणि गुयाना येथे जाणार होते. मात्र, अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे त्यांनी हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

दोहा महत्त्वाचे केंद्र

अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार कतारची राजधानी दोहा येथे झाला होता. अफगाणिस्तानातील घडामोडींवर महत्त्वाचे संवाद केंद्र दोहा बनले आहे. मायदेशी येताना परराष्ट्रमंत्री जयशंकर दोहा येथे काही काळ थांबले. कतारचे शेख मोहम्मद बीन अब्दुल रहीम अल थानी आणि त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.