
सकाळी कोणतेही काम करण्याचा उत्साह वेगळाच असतो. कार्यालयातही सकाळच्या शिफ्टला जाणे अनेकांना आवडते, मात्र जसजशी दुपार होत जाते, तसतसा उत्साह मावळतो. उन्हाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या उकाड्यामुळे तर दुपारची वेळ काही वेळा कंटाळवाणी होऊ शकते. कार्यालयात दुपारी झोप आल्यावर इम्प्रेशनही बॅड पडते. काहींचे रात्रीच्या वेळी कामामुळे जागरण होते, त्यामुळे दुपारी झोप येते. दुपारच्या झोपेची समस्या कशी सोडवाल, यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरून पाहू शकता.
– दिवसा 20 मिनिटे डोळे मिटून शांत बसून राहणे किंवा शक्य असल्यास पडून राहणे. अशा प्रकारच्या झोपेला पॉवर नॅप म्हणतात. या झोपेमुळे झोप तर उडतेच, शिवाय मेंदूला आराम मिळतो.
– दुपारच्या झोपेपासून सुटका हवी असल्यास कॉफी पिऊ शकता. कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदूची क्रिया आणि मज्जासंस्था सक्रिय करते. यामुळे झोप उडते. दुपारचं जेवण झाल्यानंतर लगेच कॉफी पिऊ नका. त्याऐवजी काही वेळेनंतर कॉफी प्या.
– ऑफिसमध्ये दुपारी झोप येत असेल तर थंड पाण्याने चेहरा धुवा. थंड पाण्यामुळे शरीराला आराम आणि ऊर्जा मिळते. यामुळे शरीराचे तापमान सामान्य होईल आणि झोपदेखील उडायला मदत होईल.































































