मर्क्स कामगार 15 ऑगस्टला सामुदायिक आत्मदहन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

एपीएम टर्मिनल (मर्क्स ) मधिल काढून टाकलेल्या त्या 99 कामगारांनी सुरू केलेले आंदोलन आणखी चिघळणार असून 15 ऑगस्टला कुटुंबासह सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. शनिवार 10 रोजी लेबर कॉन्ट्रॅक्टर जमशेद अश्रफ यांच्या सोबत कामगारांची बैठक निष्फळ झाली आहे. जमशेद अश्रफ यांनी कामगारांना मुकाट्याने मिळेल तो मोबदला घ्या. कितीही मोठा मध्यस्त आला तरी तुम्हाला कामावर घेणे शक्य नाही, अशी दर्पोक्ती केल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून कामगारांनी देखील पोलिसांच्या परवानगीची वाट न पहाता 13 ऑगस्ट पासून आमरण उपोषण तर 15 ऑगस्टला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

मर्क्समधून काढून टाकलेल्या 99 कामगारांनी दि. 29 पासून गेट समोर साखळी उपोषण सूरू केले आहे. शनिवार 13 दिवस या आंदोलनाला पूर्ण झाले मात्र कोणीही या कामगारांशी चर्चा करण्यासाठी आला नाही.

उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या हद्दीत एपीएम टर्मिनल (मर्क्स ) ही डेन्मार्क देशातील मल्टीनॅशनल कंपनी आहे. 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंपनीत 550 कामगार काम करीत होते. मात्र केंद्रातील डीपीडी आणि कामगार विरोधी धोरणांचा बाऊ करत कंपनीने फेब्रुवारी 2018 मध्ये 99 कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी केले. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील आणि सर्व पक्षांचे नेते यांनी अनेकवेळा मध्यस्थी करून कामगारांना कामावर घेण्यासाठी विनंती केली होती. मात्र कंपनी व्यवस्थापनाने या सर्वांची विनंती धुडकावून या 99 कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला होता. सध्याच्या घडीला अत्यंत हालाखीत हे कामगार आपले जीवन कंठत आहेत.

या 99 कामगारांना कामावर घ्यावे यासाठी माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर, पागोटेचे सरपंच भार्गव पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 पासून साखळी उपोषण सुरू आहे. आज चार कामगारांसोबत झालेल्या बैठकीत ठेकेदार जमशेद अश्रफ यांनी दर्पोक्ती केल्यानंतर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज झालेल्या या बैठकीला ओरिएन्ट फ्रेटचे जमशेद अश्रफ, कामगार प्रतिनिधी समीर म्हात्रे, धर्मेंद्र पाटील, विक्रम ठाकूर, देवेंद्र भोईर, संजय म्हात्रे, रोशन ठाकूर आदी उपस्थित होते.