सामना प्रतिनिधी । नाशिक
नाशिकजवळील अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हब महाविद्यालयात सर्व अभ्यासक्रमांच्या तासिका नियमित होत नसल्याने युवासेनेच्या वतीने व्यवस्थापनाविरोधात आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या दणक्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन पत्र शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावे दिले आहे, अशी माहिती युवा सेना विस्तारक तथा पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य अमित पाटील यांनी दिली.
अनेक दिवसांपासून सपकाळ नॉलेज हब महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या तासिका होत नव्हत्या. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होवूनही अभ्यासक्रम शिकविला न गेल्याने परीक्षेला सामोरे जायचे कसे, हा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत होता. सिनेट सदस्य व युवा सेना विस्तारक अमित पाटील यांना या विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. पाटील यांनी शिक्षणमंत्री, शिक्षण राज्यमंत्री, कुलगुरू आणि राज्यपाल यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर महाविद्यालयाने तासिका तात्पुरत्या सुरू केल्या. मात्र, तासिका नियमित नसल्याने आज अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने तीव्र आंदोलन छेडले. यात शेकडो विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. तासिका नियमित घ्याव्या, वाय-फाय सुविधा पुरवावी, बसचे योग्य व्यवस्थापन करावे, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नये, अभ्यासक्रम शिकवून झाला नसल्याने ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलावी, या मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात युवा सेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, शैलेश सूर्यवंशी, महेंद्र बडवे, दिलीप बल्लाळ, रवी वारुंगसे, समाधान बोडके, महेश गोडसे, सिद्धेश सोमवंशी, निवृत्ती लांबे, संपत चव्हाण, मनोहर महाले, सचिन दीक्षित, भूषण अडसरे, नितीन पवार, नगरसेविका कल्पना लहांगे, रामनाथ बोडके, रावसाहेब कोठुळे, शिवाजी कसबे, समाधान आहेर, संजय मेढे, रंगनाथ मिंडे, प्रमोद कोहोकडे, शुभम शेलार आदींसह शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
आदित्य ठाकरे यांच्या नावे दिले लेखी आश्वासन
शिवसेना, युवा सेना शिष्टमंडळाने प्राचार्य व प्राध्यापकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व्यवस्थापक अशोक चव्हाण यांनी तोंडी आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे प्राध्यापकांनी मान्य केले. बस, तसेच वाय-फाय सुविधेत अजून सुधारणा करू, तासिका नियमित सुरू ठेवू, असे प्राचार्य आर. बी. सौदागर, एस. बी. बागल यांच्या स्वाक्षरीचे आश्वासन पत्र शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावे देण्यात आले.


































































