केंद्राच्या ‘अग्निपथ’ला कडाडून विरोध! ठिकठिकाणी टायरची जाळपोळ; उत्तर प्रदेश, राजस्थानातही निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने लष्करातील भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर हिंदुस्थानातून कडाडून विरोध झाला आहे. योजना जाहीर करून एक दिवस उलटत नाही तोच बिहारमध्ये शेकडो तरुण लाठय़ाकाठय़ा घेऊन रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी टायरची जाळपोळ केली. बक्सरमध्ये अनेक रेल्वेगाडय़ा रोखण्यात आल्या. संतप्त तरुणांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. उत्तर प्रदेश आणि राजस्थानातही तीव्र निदर्शने करण्यात आली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली. त्यानंतर दुसऱयाच दिवशी बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली. बिहारमध्ये संतापाचा मोठा उद्रेक झाला. आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे वाहतूक रोखली. त्यानंतर मुझफ्फरपूरमध्ये टायरची जाळपोळ करून रास्ता रोको केले. आरा येथेही आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि जीआरपीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ‘अग्निपथ’ योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम राहिले. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिह्यातही तरुण मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले, तर राजस्थानात जयपूरमध्ये तरुणांनी निदर्शने केली. हे तरुण मागील दोन वर्षांपासून लष्करात भरती होण्यासाठी तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत केवळ चार वर्षे सेवेची संधी देणारी ‘अग्निपथ’ योजना केंद्राने जाहीर केल्यामुळे तरुण संतप्त झाले आहेत.

सरकार 5 वर्षांचे, मग रोजगार 4 वर्षांचा का? वरुण गांधींचा सवाल

‘अग्निपथ’ योजनेवर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर सरकार पाच वर्षांसाठी निवडले जात असेल, तर मग तरुणांना रोजगार अर्थात देशाची सेवा करण्यासाठी फक्त चार वर्षे का, असा खडा सवाल त्यांनी केला. ‘अग्निपथ’बाबत तरुणांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. योजनेबाबत तुमचे मत काय ते मला सांगा, असे आवाहन त्यांनी केले.

यूपी, मध्य प्रदेश अग्निवीरांना पोलीस भरतीत प्राधान्य देणार

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांनी अग्निवीरांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्याची तयारी दर्शवली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत लष्करात दाखल होणाऱया तरुणांना लष्करातील चार वर्षांच्या सेवेनंतर पोलीस दलातील भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी केली.

युव्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय केले? सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा अहेर

‘अग्निपथ’ योजनेविरुद्ध असंतोष उफाळला असतानाच भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी युव्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करीत भाजपला घरचा अहेर दिला. युव्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले हिंदुस्थानी विद्यार्थी आता मायदेशी स्थायिक झाले आहेत. त्यांना आणण्यासाठी हरदीप पुरी पोलंडपर्यंत गेले. आता ते दिसत नाहीत. सरकार त्या विद्यार्थ्यांसाठी काय करतेय, असे ट्विट स्वामी यांनी केले.