कार्यालयातच विषारी औषध प्राशन… कृषी अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक

मालवण तालुका कृषी कार्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन वसंत गवंडे (वय 52, रा. भरड मालवण) यांनी कार्यालयातच किटकनाशक औषध पिल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गवंडे यांना सहकाऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. मालवण पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

सचिन गवंडे हे मालवण तालुका कृषी कार्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सोबत काम करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गवंडे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू होती. अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली.

सचिन गवंडे यांची चौकशी सुरू असल्याने त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न देता कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत आदेश होते. त्यानुसार ते कार्यालयात उपस्थित होते. बुधवारी कार्यालयात आठवडा मिटिंग असल्याने कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी आत मीटिंगमध्ये होते. मात्र गवंडे यांना मीटिंगमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. या दरम्यान ही घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या