
सामना प्रतिनिधी। अहमदपूर
तालुक्यातील शिवणखेड येथे ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला ग्रामपंचायतीत डांबून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घटली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिसांत मारहाण आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील शिवनखेड येथील ग्रामपंचायतीत राजाबाई सोनकांबळे ( 45 ) या गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. त्यासाठी लागणारे रस्ते-नाले साफ करण्याचं साहित्य त्या ग्रामपंचायतीतच ठेवतात. मात्र कुणीतरी जाणून-बुजून त्यांचा झाडू आणि टोपले मोडून टाकले. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीत आलेल्या आणि त्यांच्याच गावातील असलेल्या गोट्या ठाकूर, अजित ठाकूर यांना जाब विचारला आहे. यावर चिडलेल्या गोट्या ठाकूर आणि इतर दोघांनी या महिलेला आम्हाला जाब विचारते का म्हणत, ग्रामपंचायतीचा दरवाजा आतून बंद करून त्यांना लाठ्या-काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. यात राजाबाई गंभीर जखमी झाल्या. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजाबाई यांना एकच मुलगा आहे. तोही रोजगारासाठी शहरात गेलेला आहे. त्यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे त्या रस्ते झाडून आणि नाले साफ करून मिळालेल्या पैशात उदरनिर्वाह करतात.
































































