नगर – खोदलेले रस्ते, तुंबलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी अन् वाहतूककोंडी

ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नगर शहरात समस्यांचा महापूर आला आहे. महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जागोजागी खोदलेले रस्ते, तुंबलेले पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, वाहतूककोंडीमुळे नागरिकांचा संताप होत आहे. विविध समस्यांनी नागरिक त्रस्त असून, महापालिका प्रशासन मात्र सुस्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नगर शहराच्या मध्यवर्ती भागासह सावेडी उपनगर, केडगाव, बुरुडगाव रस्ता, मुकुंदनगर, कल्याण रस्ता आदी भागांत समस्यांचा विळखा आहे. ‘फेज-टू’ व भुयारी गटार योजनेसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. त्यामुळे शहर व उपनगरांतील सर्वच रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. मनपा प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराने विकासाच्या वल्गना हवेतच विरल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अडचणींचा सामना करावा लागत आहेत. मात्र, याबाबत मनपाच्या अधिकाऱयांना कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाविषयी संतापाची लाट आहे. रस्ते, गटारे, दिवाबत्ती, पाण्याची गळती, ड्रेनेजची समस्या तसेच मोकळ्या जागेत अतिक्रमणांचा विळखा आदी प्रकारांमुळे समस्यांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात अनेक भागांत अस्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे होणारा डासांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या बनली आहे. त्याकडे प्रशासन व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

अतिक्रमणे हटवा; अन्यथा उपोषण – संतोष नवसुपे

– नगर शहरात काही हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि दुकानांची अनधिकृत बांधकामे आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजुरी दिलेली ही आरसीसीमधील काही अनधिकृत बांधकामे महामार्गावर, शहरातील मध्यवस्तीतील रहदारीच्या रस्त्यावर उभी आहेत. ही अनधिकृत बांधकामे त्वरित हटवावीत; अन्यथा 15 ऑगस्टला महापालिका आवारात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

दुर्गंधी अन् दूषित पाणीपुरवठा

– भुयारी गटार योजना आणि ‘फेज-2’मुळे शहर व उपनगरांत ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दूषित सांडपाणी साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटली असून, वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्तेखोदाईमुळे जलवाहिन्या फुटून नळांना दूषित पाणी येत आहे.

खड्डय़ांमुळे रस्त्यांची चाळण

– माळीवाडा, शनिचौक, टिळक रोड, बुरुडगाव रस्ता, कल्याण रस्ता यांसह केडगाव व सावेडी उपनगरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डय़ांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना दररोज या खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. भुयारी गटार योजनेचे काम कासवगतीने सुरू आहे.

आमदार जगताप यांनी प्रशासनाला खडसावले, नगर शहरातील विविध समस्यांबाबत

नगरसेवक महापालिका सभा, स्थायी समिती सभांमध्ये आवाज उठवत होते. मात्र, प्रशासन त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. आता आमदार संग्राम जगताप यांनीही महापालिका प्रशासनाला खडसावले आहे. आयुक्त, उपायुक्त व प्रमुख अधिकारी कार्यालयाबाहेर निघायलाच तयार नाहीत. कार्यालयात बसून केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. महापालिका प्रशासन आर्थिक टंचाईचे कारण देत शहरातील मूलभूत सोयीसुविधा, अत्यावश्यक असलेली कामेही करण्यास टाळाटाळ करत आहेत. जर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, तर ठेकेदारांची जुनी बिले कशी काढली जात आहेत? असा सवाल आमदार जगताप यांनी केला आहे. नगरकरांना योग्य सुविधा तातडीने मिळाल्या नाहीत तर महापालिका प्रशासनाविरोधात एल्गार पुकारावा लागेल, असा इशाराही आमदार जगताप यांनी दिला आहे.