
शहरातील केडगाव परिसरातील एका सोसायटीमध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, असे शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.
डाळ खुळा काळे, अक्षय काळे, विलेश काळे, मोनीश चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर डाळ काळे याला अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी ही महिला घरामध्ये एकटी होती. याचा गैरफायदा घेत या चौघांनी घरात प्रवेश करून तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. आरोपी आणि पीडित महिला हे एकमेकांचे नातेवाईक असून, मागील भांडणाच्या कारणातून आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत महिलेला मारहाण करण्यात आली असून, तिच्यावर सध्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी डाळ काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तीन आरोपी फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.