
अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठित सराफ बाजारात तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोने घेऊन सहा कारागीर फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून बाजारात भीतीचे सावट पसरले आहे. कोट्यवधी रुपयांचा सोन्याचा माल घेऊन हे कारागीर बेपत्ता झाल्याने पोलिसांनाही वेगाने तपासाची चक्रे फिरवावी लागत आहेत.
फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी रस्ता) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सहा संशयित कारागीरांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, त्यांच्याविरुद्ध तपास वेगाने सुरू आहे. दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा आणि स्नेहा बेरा अशी त्या संशयित कारागीरांची नावे आहेत.
देडगावकर बंधूंचे ‘देडगावकर ज्वेलर्स’ हे प्रतिष्ठित दुकान सराफ बाजारात असून, त्यांच्या तळमजल्यावर हे कारागीर दागिने बनवण्याचे काम करत होते. त्यापैकी दोन कारागीर – सोमनाथ सामंता आणि आन्मेश दुलोई – हे शेजारील सोनार विजय जगदाळे यांच्या दुकानात कार्यरत होते.
रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी कृष्णा देडगावकर तळमजल्यावर गेले असता कारागीर दिपनकर माजी गायब असल्याचे दिसून आले. संपर्क साधल्यावर त्याने “दहा मिनिटांत येतो” असे सांगितले मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. त्याचवेळी इतर पाच कारागीरांचे मोबाईलही बंद लागल्याने संशय निर्माण झाला. पुढील तपासात हे सर्व कारागीर आपल्या निवासस्थानी नसल्याचे आणि घरे कुलूपबंद असल्याचे आढळले. अखेर खात्री पटली की या सर्वांनी सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले आहे.
या प्रकरणात एकूण 2 किलो 21 ग्रॅम सोने व दागिने चोरीस गेले असून, त्याची किंमत तब्बल 1 कोटी 1 लाख 5 हजार रुपये इतकी आहे. चोरी गेलेल्या सोन्यात कृष्णा देडगावकर, प्रतीक देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, भरत शिराळकर, बरजहान शेख, प्रमोद गाडगे आणि इम्रान अली या सोनारांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात उघड झाले आहे की या कारागीरांनी गेल्या काही महिन्यांत सोनारांचा विश्वास संपादन करून लबाडीने ही चोरी केली आहे. त्यांच्या पत्त्यांची स्पष्ट माहिती नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. तरीही कोतवाली पोलिसांनी विशेष पथक तयार करून या कारागीरांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. राज्याबाहेरील संभाव्य ठिकाणांवरही शोधमोहीम राबवली जात असून तपास अधिक गतीमान करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सराफ बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी आपल्या कारागीरांबाबत सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे. विश्वासावर चालणाऱ्या सोनार व्यवसायात या घटनेने खळबळ माजली असून व्यावसायिक वर्गाने पोलिस प्रशासनाकडे अधिक सुरक्षा आणि दक्षतेची मागणी केली आहे.


























































