
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला त्यांच्या पत्नी मेलेनिया यांच्यासह हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. गुजरातपासून हा दौरा सुरू होत आहे. अहमदाबाद येथील मोटारा स्टेडियम येथे ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. पण, या कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेल्या एका प्रवेशद्वाराचं गेट कोसळल्याची घटना शनिवारी घडली आहे.
मोटेरा स्टेडिअममधील कार्यक्रमासाठी अनेक प्रवेशद्वारं बनवण्यात आली आहेत. त्यातील गेट क्र. 3 जिथून पंतप्रधान आणि ट्रम्प यांचा ताफा स्टेडिअममध्ये दाखल होणार होता, तिथे एक तात्पुरत्या स्वरुपाचं गेट बनवण्यात आलं होतं. मात्र, शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे हे गेट खाली कोसळलं. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालं नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा हिंदुस्थान दौरा सोमवारपासून अहमदाबादमधून सुरू होणार आहे. त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर असणार आहेत. अहमदाबाद विमानतळापासून मोटेरा स्टेडियमदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प रोड शो करणार आहेत. त्यानंतर ‘मरीन वन’ या विशेष हेलिकॉप्टरने विमानतळापर्यंत आणि आग्रा विमानतळापासून ताजमहालापर्यंत जाणार आहेत. 36 तासांचा हा दौरा कडक सुरक्षेत पार पडणार असून त्यावर सुमारे 100 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
ट्रम्प यांच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी अमेरिकी सिक्रेट सर्व्हिसवर असणार आहे. त्याशिवाय हिंदुस्थानी लायजनिंग ऑफिसर, एनएसजी, चेतक कमांडो, निमलष्करी दल तैनात असणार आहेत. तर बाहेरील सुरक्षेसाठी गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचे 25 हजार पोलीस तैनात असणार आहेत. या सर्व सुरक्षेवर तासाला तब्बल दीड कोटी रुपये खर्च होणार आहे. इतकी सगळी सुरक्षा व्यवस्था चोख असताना असा प्रकार घडल्याने सुरक्षा व्यवस्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

























































