घर फोडून 15 लाखांचा ऐवज लुटला, नगरमधील घटनेने परिसरात खळबळ

नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बंगला फोडून 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख 60 हजारांची रक्कम असा 15 लाख 73 हजारांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नोबेल हॉस्पिटलचे सीईओ विजय माणिकराव निकम (वय 58 रा. ओम बंगला, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. चोरटय़ांनी शुक्रवारी पहाटे निकम यांचा ‘ओम’ बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे मंगळसूत्र, बांगडय़ा, अंगठय़ा, कर्णफुले, चेन, तसेच हिऱयाचे मंगळसूत्र असा सुमारे 30 तोळ्यांचा ऐवज व चार लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

सकाळी हा चोरीचा प्रकार लक्षात आला. शुक्रवारी रात्री उशिरा निकम यांनी यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके तपास करीत आहेत.