नगरमध्ये 65 हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी, नगर तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर तालुक्यात आगामी हंगामात खरीप पिके व चारापिकासह 65 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने खते व बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी दिली.

यावर्षी खरीप हंगामात सर्वाधिक म्हणजे 18 हजार हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात येणार आहे. यंदा मुगाच्या क्षेत्रात तीनपट वाढ होणार आहे. त्याखालोखाल 11 हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी होणार आहे. मका आणि तूर प्रत्येकी 3500 हेक्टर, सोयाबीन 9500 हेक्टर, उडीद 475, इतर कडधान्य 900 हेक्टर, भुईमूग 475, सूर्यफूल 180 हेक्टर, कापूस 2250 हेक्टर, कांदा 7 हजार हेक्टर, ऊस 550 हेक्टर पिकाखाली क्षेत्र आहे. ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजने’अंतर्गत फळबाग लागवड करण्यात येणार असून, त्यासाठी 480 हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून, 9500 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. पुढील हंगामाच्या दृष्टीने शेतकऱयांच्या शेतात सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार असून, पुढील हंगामासाठी लागणारे नऊ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘जेएस 335’ या वाणाचे बियाणे वापरण्यात येणार आहे. यावर्षी 2200 हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सहा गावांमध्ये ‘एक पीक एक वाणा’चा प्रसार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी ‘अजित 155’ व ‘अजित 199’ या वाणांचा वापर करण्यात येणार आहे. नगर तालुक्यात 3 हजार 900 हेक्टरवर तूर पिकाची लागवड होणार आहे. यासाठी बीडीएन 711, बीएसएमआर 175, बीएसएमआर 736 या वाणांची लागवड होणार आहे.

माती परीक्षणावर आधारित पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्यात येणार असून, युरिया खताचा वापर दहा टक्के कमी करण्यात येणार आहे. सोयाबीन आणि मूग पिकाची उगवण क्षमता चाचणी शेतकऱयांना प्रात्यक्षिक दाखवून करण्यात येणार आहे. तसेच, रुंद सरी वरंबा पद्धतीने 3500 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, मूग, तूर व भुईमूग पिकांची लागवड करण्यात येणार आहे.

शेतकऱयांसाठी 64 शेतकरी शेती शाळा घेण्यात येणार

n नगर तालुका कृषी विभागाच्या वतीने या वर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या 64 शेतकरी शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये विशेष म्हणजे महिला शेतकऱयांसाठी 18 शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी दिली.