
कर्जतमधील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा भागात एकूण 5 कोटी 74 लाखांचे प्रत्येकी 3 हजार मेट्रिक टन क्षमतेचे राज्य वखार महामंडळाचे भव्य वखार उभे राहणार आहे. वखार उभारणीच्या कामाला मान्यता मिळाली असून, येत्या काही दिवसांत वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे. यामुळे कर्जत, जामखेड तालुक्यांतील शेतकऱयांची शेतमाल ठेवण्याच्या जागेची चिंता कायमची मिटणार आहे.
कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले, तरी या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतकऱयांनी मोठय़ा कष्टाने पिकविलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसे. सरकारी हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर मका, तूर यांसारखे इतर धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शेतमाल खरेदी पूर्णपणे करता येणे शक्य नव्हते. परिणामी शेतकऱयांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत होता. आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शेतकऱयांची शेतमाल ठेवण्याची समस्या कायमची नाहीशी होणार आहे.
राज्य वखार महामंडळाकडून कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे, तर जामखेड तालुक्यात खर्डा येथे प्रत्येकी 3 हजार मेट्रिक टन क्षमतेचे अजस्त्र अशा वखार उभारणीच्या कामास मान्यता मिळाली आहे. येत्या काही दिवसांत वखार महामंडळाकडून वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार असून, वखार उभारणीचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही वखारींचा प्रामुख्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील हजारो शेतकऱयांना उपयोग होणार आहे.
कर्जत व जामखेड तालुक्यांतील शेतकऱयांना शेतमाल ठेवण्यासाठी मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत होता. सरकारी हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर अपुऱया जागेमुळे पूर्ण क्षमतेने शेतमाल खरेदी करणेदेखील चिंताजनक ठरत होते. दरम्यान, यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर कर्जतमधील मिरजगाव व जामखेडमधील खर्डा येथे वखार महामंडळाकडून वखार उभारण्यात येत आहे. वखार उभारणीच्या कामाला नुकतीच मान्यता मिळाली असून, येत्या काही दिवसांत वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे व लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्यात येईल. – रोहित पवार, आमदार.



























































