नगर-बीड महामार्गावर खड्डे, संरक्षण कठडेही गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनधी, आष्टी

नगर-बीड महार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आष्टी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणारा हा महामार्ग आहे. या मार्गावरून अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात झाले आहेत. परंतु बांधकाम विभागाला मात्र अद्याप जाग आलेली नाही.

या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुलाचे संरक्षण कठडे तुटले आहेत. तर काही ठिकाणी लोखंडी पाईपचे कठडे बसवण्यात आले होते, त्याचे पाईप गायब झाले आहेत. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सपशेल डोळेझाक करत आहे. संरक्षण कठडे तुटल्याने अनेक अपघात होत आहे. मागील वर्षी वाघळूज घाटात ट्रॅव्हल्स कोसळून मोठा अपघात झाला. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. पंधरा दिवसांपूर्वी शेरी येथे इंडिका कार पुलावरून कोसळली. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. असे अनेक अपघात या मार्गावर होत आहेत. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

किमान डागडुजी तरी करा

बीड-नगर या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याची चर्चा मध्यंतरी झाली. मात्र नेमकी कुठे माशी शिंकली, हे कळायला मार्ग नसल्याने किमान आहे त्या महामार्गाची तरी किमान डागडुजी करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.