नगर शहरात शिवभोजन केंद्र सुरू, गोरगरीबांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने सर्वत्र शिवभोजन योजना पुन्हा चालू केली आहे. नगर शहरामध्ये तीन ठिकाणी या योजने अंतर्गत पार्सल देण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पाच रुपयांमध्ये जेवण सुरु करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता उपाशी राहू नये, म्हणून राज्य सरकारने शिवभोजन योजना या कालावधीमध्ये पुन्हा सुरू केली आहे. या योजनेमध्ये पूर्वी दहा रुपयाला जेवण मिळायचे, आता पाच रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे. नगर शहरामध्ये याअगोदर सात ठिकाणी भोजन योजना सुरू केली होती. त्यातील तीन ठिकाणी हे आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. शहरामध्ये योजना सुरू करण्यात आल्यानंतर या ठिकाणी अनेकांनी त्याचा लाभ घेतला. अकरा ते तीन हा कालावधी यासाठी ठेवण्यात आलेला आहे.

शिवभोजन केंद्रावरून सोमवारी नागरिकांना पार्सल देण्यात येत होते. मात्र एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी सोशल डिस्टेंस त्यांच्यामध्ये ठेवले जात होते. सातत्याने नागरिकांना गर्दी करू नका, अशा सूचना देण्यात येत होत्या. तसेच काही केंद्राच्या बाहेर मार्किंग सुद्धा करण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही योजना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.