
बँक स्थापनेचे शताब्दी वर्ष संस्मरणीय करण्यासाठी नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी गुरू माउली मंडळाने सभासदांना वाटलेली ‘शताब्दी घड्याळे’ चौकशीच्या फेऱयात सापडली आहेत. या घड्याळांच्या खरेदीतून 14 लाख रुपयांचे बँकेचे नुकसान झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी ऍड. श्रीराम वाघ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यांना दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या घड्याळ खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षकनेते प्रवीण ठुबे, विकास डावखरे, गणेश वाघ आणि संतोष खामकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी कलम 83 अंतर्गत प्राथमिक शिक्षक बँकेतील घड्याळ घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संचालक मंडळावर चौदा लाख एक हजार सहाशे रुपयांचे बँकेचे व पर्यायाने सभासदांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच्या चौकशीसाठी ऍड. श्रीराम वाघ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ठुबे यांनी दिली.
प्राथमिक चौकशीत ठपका
घड्याळ खरेदी व्यवहार अनियमितता आणि अपहाराची चौकशी प्रक्रिया पूर्ण करून चौकशी अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी नुकताच अंतिम चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला आहे, असे सांगून ठुबे म्हणाले, या चौकशी अहवालात घड्याळ घोटाळा व्यवहारातील अनियमिततेवर ठपका ठेवत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 83 अंतर्गत चौकशी करण्याबाबत शिफारस केलेली आहे. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी कलम 83 अंतर्गत चौकशी करून दोन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशी अहवालात 14 लाख 1 हजार 600 रुपयांचे आर्थिक नुकसान बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने केलेले आहे, असे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. ही रक्कम मोठी असल्यामुळे बँकेची कलम 83 अंतर्गत चौकशी करून जबाबदार संचालक मंडळाकडून वसुली करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी ऍड. श्रीराम वाघ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.



























































