भाजप कार्यकर्त्यांची शिंदे गट शहराध्यक्षाच्या हॉटेलवर दगडफेक, माजी मंत्र्याच्या मुलासह 60 जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भातोडी पारगाव येथील लग्नकार्यामध्ये झालेल्या दोन गटांमधील वादाचे पडसाद मंगळवारी रात्री नगरमधील केडगावमध्ये उमटले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुफान धिंगाणा घालत शिंदे गटाचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत नागरिकांच्या चारचाकींचे प्रचंड नुकसान झाले. याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-पुणे महामार्गावर केडगाव येथे शिंदे गटाचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांचे ‘रंगोली’ नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी (दि. 14) रात्री रात्री साडेदहाच्या सुमारास भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थकांनी हॉटेलवर तुफान दगडफेक केली. 50 ते 60 जणांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने हॉटेल परिसरात प्रचंड पळापळ सुरू झाली. दगडफेकीत ग्राहक म्हणून आलेल्या नागरिकांच्या गाडय़ांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच याच परिसरात राहणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक अमोल येवले आणि संग्राम कोतकर यांचे समर्थक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी घटनेचा निषेध नोंदवत नगर-पुणे महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला.

दगडफेकीची माहिती मिळताच, कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल होताच दगडफेक करणारे पसार झाले. त्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. दरम्यान, ‘रंगोली’चे मालक विठ्ठल सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांच्यासह 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणप्रकरणी सातपुते यांच्यावर गुन्हा

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा या ठिकाणी लग्न समारंभ होता. या समारंभामध्ये निखिल कापसे आले होते. तेव्हा ओंकार दिलीप सातपुते याने कापसे याला ‘तू आमदार शिवाजी कर्डिले यांचा उदो उदो करतो, त्यांचे फोटो सोशल मीडियाला सारखे टाकत असतो’, असे म्हणत हुज्जत घातली होती. त्यानंतर सातपुते याने समर्थकांना बोलावून मला आणि संजय धोत्रे याला मारहाण केल्याचे सांगितले. याप्रकरणी निखिल कापसे याने दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार सातपुते, सुनील सातपुते, अभिषेक शिर्के व इतर 10 ते 15 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.