कोपरगावात कोरोनाचा पहिला रुग्ण, महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह 

455

कोपरगाव शहरातील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. हा शहरातला कोरोनाचा पहिलाच पॉझिटीव्ह रूग्ण आहे. या महिला डॉक्टरवर कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. सध्या प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी कोपरगाव शहर व तालुक्यात 3 महिलांचा सारी आजाराने मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या महिलेने खासगी लॅबला टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसूनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. लोणी येथील रहिवासी असलेला मात्र कोपरगाव शहरातील नामवंत विद्यालयात लिपिक या पदावर कार्यरत असणारा कर्मचारी दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्या बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 13 पैकी एका महिला डॉक्टरचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर बाकीच्या 12 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधित महिला राहत असलेला राम मंदिर पाठीमागील, सेवानिकेतन हायस्कूल हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तेथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

तब्बल दोन महिन्यानंतर कोपरगाव तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा तपास करून सदरचा परिसर सील करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या