
शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या तिसऱया टप्प्यातील गर्डरच्या कामांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या कामांच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल मार्गावरील वाहतूक पहिल्या टप्प्यात मध्यरात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. या उड्डाणपुलासाठी एकूण 85 पिलर असून, त्यांतील 80 पिलर पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामही प्रगतिपथावर आहे. आता या खांबावर सिमेंट प्लेटा (गर्डर) टाकले जाणार आहेत. या कामाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी बैठक झाली. या बैठकीला खासदार सुजय विखे-पाटील, आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रफुल्ल दिवाण, नगररचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले उपस्थित होते.
सक्कर चौक ते कोठीपर्यंतचा रस्ता, तसेच दिल्लीगेटमार्गे अवजड वाहतूक होणार नाही, असे बैठकीत ठरले आहे. शहरातून ही वाहतूक होऊ नये यासाठी शहरातील विविध रस्त्यांवर आता हाइट्स बॅरिकेड्स लावले जाणार आहेत.
उड्डाणपुलाचे काम किमान सहा महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. पण पहिल्या टप्प्यात 15 दिवसांसाठी स्टेशन रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक मध्यरात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण बंद ठेवली जाईल. याबाबतचा आदेश पोलीस प्रशासनाकडून जारी करण्यात येणार आहेत.
बायपासवरील खड्डेदुरुस्ती सुरू करण्याची सूचना
स्टेशन रस्त्याची वाहतूक मध्यरात्री टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या काळात सर्व वाहतूक बायपासमार्गे वळविली जाणार आहे. त्यामुळे बायपासवरील खड्डेदुरुस्तीच्या सूचना खासदार सुजय विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच बायपासअंतर्गत असलेल्या जामखेड रोड ते पाथर्डी रस्त्यावरील चाँदबीबी महालापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्याचेही संबंधित विभागाला सांगितले आहे, असेही त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून, गर्डरच्या कामांना येत्या 10 ते 12 दिवसांत सुरुवात केली जाणार आहे. सुमारे 80 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर बसकिताना वाहतूक पूर्णपणे बंद ठेकण्यात येणार आहे. वाहतुकीसंदर्भात कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. – प्रफुल्ल दिवाण, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.





























































