सक्षम अग्निशमन यंत्रणा नसतानाही इमारतीचा वापर, प्रशासनाचा हलगर्जीपणा घटनेला कारणीभूत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना घडल्यानंतर सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे आदेश राज्य सरकारकडून दिले गेले. रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम केली जावी व आगीच्या दुर्घटना टळाव्यात, असा राज्य सरकारचा यामागील उद्देश होता. मात्र, अनेक रुग्णालयांकडून, विशेषतः शासकीय रुग्णालयांकडून केवळ कागदोपत्री ‘फायर ऑडिट’ झाल्याचे आता समोर येत आहे. नगर जिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिटमध्ये त्रुटी आढळलेल्या असतानाही त्याची पूर्तता न करताच या इमारतीचा वापर कसा केला गेला? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि. 6) लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. वारंवार अशा घटना घडूनही त्याची गंभीर दखल घेतली जात नाही, हे या घटनेतून समोर आले आहे. शासनाकडून फायर ऑडिटचा आदेश दिला गेल्यावर नगरच्या आरोग्य यंत्रणेने त्रयस्थ संस्थेकडून मार्च महिन्यात फायर ऑडिट करून घेतले. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा, आग प्रतिबंधक उपाययोजना सज्ज नसल्याचे व केवळ 15 फायर इस्टिंग्युशर उपलब्ध असल्याचे या फायर ऑडिटमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची पूर्तता केली जाणे अपेक्षित होते, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत या इमारतीचा चक्क अतिदक्षता विभागासाठी वापर सुरू करण्यात आला.

फायर ऑडिट केल्यानंतर पूर्तता करण्यासाठी सुमारे अडीच कोटींच्या निधीची गरज होती, असे आता आरोग्य प्रशासन सांगत आहे. त्यासाठीचे कोटेशनही तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे व दुर्लक्षामुळे याची पूर्तता होऊ शकली नाही. दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली फायर ऑडिटमध्ये त्रुटी असतानाही या इमारतीचा वापर सुरू झाला. शनिवारी झालेल्या आगीच्या घटनेत केवळ अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे, जे फायर इस्टिंग्युशर बसविण्यात आले होते, त्याच्या वापराचे प्रशिक्षण असलेले कर्मचारीही तेथे उपस्थित नव्हते. परिणामी, आग लागल्यानंतर तातडीच्या म्हणून कोणत्याही उपाययोजना करता आल्या नाहीत.

…तर मोठी हानी टाळणे शक्य झाले असते

शासनाच्या निर्देशानुसार रुग्णालयात स्वतःची अग्निशमन यंत्रणा सज्ज असती, तर मोठी हानी टाळणे कदाचित शक्यही झाले असते. उपाययोजना नसतानाही सुरू करण्यात आलेल्या इमारतीच्या वापरामुळे मोठी हानी झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच याच इमारतीमधील सदोष विद्युतव्यवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. पोलीस प्रशासनाकडेही हे पत्र उपलब्ध झालेले आहे. या पत्रात सदोष व्यवस्थेमुळे आगीची घटना घडून शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती, असा दावा केला जात आहे.