
नगर बाजार समिती निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्याक्षणी कर्डिले-कोतकर गटाकडून व महाविकास यांच्यामध्ये लढत होणार आहे. यामध्ये कर्डिले-कोतकर गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. अखेर 16 जागांसाठी 35 उमेदवारी रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी तब्बल 228 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील 193 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.
अकोलेत शेतकरी विकासमंडळाच्या 3 जागा बिनविरोध
संगमनेर – अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत शेतकरी विकास मंडळासमोर मविआचे आव्हान आहे. परंतु, मविआला सगळ्या जागांवर उमेदवार देता न आल्याने पिचड यांचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले.
जामखेडमध्ये 38 उमेदवार रिंगणात
जामखेड – बाजार समितीची निवडणूक दुरंगी होणार आहे. 144 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 18 जागांसाठी 38 अर्ज शिल्लक राहिले आहेत.
पाथर्डीत 118 उमेदवारांची माघार
पाथर्डी – बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 118 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 18 जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे प्रणीत आदिनाथ शेतकरी मंडळ व प्रताप ढाकणे प्रणीत जगदंबा महाविकास आघाडीमध्ये लढत होणार आहे.
भाजप व राष्ट्रवादीत थेट लढत
शेवगाव – तालुका बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ व आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ शेतकरी मंडळात लढत होणार आहे. 18 जागांसाठी 38 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
राहुरीत महाविकास आघाडीविरुद्ध विकास मंडळ
राहुरी – बाजार समितीच्या निवडणुकीत 76 जणांनी अर्ज माघारी घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप प्रणीत विकास मंडळात निवडणूक सामना होत असून, अपक्ष म्हणून प्रहार जनशक्तीचे सुरेश लांबे व इतर दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पारनेरमध्ये महाविकास आघाडी व भाजपमध्ये लढत
पारनेर – बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपमध्ये लढत होणार आहे. विखे यांच्या विरोधात आमदार लंके व माजी आमदार औटी एकत्र आले आहेत. 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. आमदार नीलेश लंके आणि विजय औटी यांच्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस 13 तर शिवसेना 5 अशा जागा दिल्या.
कोपरगावात तीन जागा बिनविरोध
कोपरगाव – बाजार समितीच्या 18 जागांपैकी तीन उमेदवार बिनविरोध झाल्याने उर्वरित 15 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत.
नेवासा बाजार समितीत 35 उमेदवार रिंगणात; एक बिनविरोध
नेवासा – बाजार समितीच्या 17 जागांकरिता 35 उमेदवार रिंगणात असून, हमाल मापाडी जागा बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना, भाजप अशी लढत होणार आहे.
श्रीगोंद्यात 18 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात
श्रीगोंदा – बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये बारा अपक्ष नशीब अजमावत आहेत. दुसऱया फळीतील नेते या निवडणुकीत उतरल्याने काही लढती लक्षवेधी होणार आहेत.
राष्ट्रवादीच्या कर्जत तालुकाध्यक्षाची हकालपट्टी
कर्जत – तालुका बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला. तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना भाजपच्या पॅनलमधून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्ष सदस्य व तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे काही जागांसाठी तिरंगी लढत होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीतून 167 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
























































