
महापालिकेने कचरा गोळा करण्यासाठी यावर्षी पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही निविदा म्हणजे पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना चरण्यासाठी आयते कुरण झाले आहे का? त्यासाठीच हे टेंडर काढण्यात आले आहे का? असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना असलेले हे टेंडर तत्काळ रद्द करण्याची मागणी जाधव यांनी केली.
आरोग्य, रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेची असते. महापालिकेने विद्युत विभागाचे खासगीकरण केले. रस्तेदेखील खासगी ठेकेदाराकडून बांधून घेतले जातात. मध्यंतरी पाणीपुरवठा विभागाचा ठेका देण्याचा घाट घालण्यात आला होता. कचरा उचलण्याचा ठेका तर आधीच दिला असून, तोदेखील वादात आहे. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱयावर कचरा उचलण्याची बोगस बिले काढण्याचा प्रकार उघडकीस आल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कचरा उचलण्यासाठी वाहने नगर मनपाच्या मालकीची आहेत. नोकरीत कायम असलेल्या शेकडो सफाई कर्मचाऱयांना महापालिका पगार देते. मग कचरा उचलणाऱया घंटागाडय़ांवर केवळ चालक ठेवून त्यांच्याकडून कचरा गोळा करून तो बुरूडगाव कचरा डेपोत टाकण्यासाठीच फक्त याचे खासगीकरण करण्यात आले आहे का? हे काम पालिका कर्मचारी सक्षमपणे करू शकतात. पालिका कर्मचाऱयांना महिन्याला दिल्या जाणाऱया पगाराइतकेच पैसे या कचरा उचलणाऱया ठेकेदाराला दिले जातात. अगोदरच ठेकेदार स्वयंभू ट्रान्सपोर्ट वादाच्या भोवऱयात आहे. तोफखाना पोलीस या कचरा घोटाळ्याची चौकशी करीत आहे. याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीदेखील त्याचे दरमहा कचरा उचलण्याचे बिल रीतसर निघत आहे. आतादेखील कचऱयाच्या नावाखाली डबर तसेच दगड, विटा, मातीचे वजन करून ते बिलात जोडले जात आहे.
नगर-कल्याण रोड तसेच पुणे-नगर रस्त्याच्या कडेला कचरा साठवून त्याचे दररोज वजन करण्यासाठी त्या कचऱयाने घंटागाडय़ा भरून त्याच त्याच कचऱयाचे दररोज वजन केले जाते. हे प्रकार पुराव्यानिशी उघड केले आहेत. तरीदेखील पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या आशीर्वादाने हे सगळे ठेकेदार उजळ माथ्याने हे प्रकार करीत आहे. वाहने पालिकेच्या मालकीची आहेत. ठेकेदार संस्था पुण्याची आहे आणि घंटागाडय़ांवर काम करणारे चालक नगरमधीलच आहे. मग हे काम पालिकादेखील करू शकते. त्यासाठी ठेकेदार नेमण्याची काय गरज. त्यामुळे पालिकेने हे गैरप्रकार थांबवावे आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी बंद करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.





























































