
नगर जिल्ह्यातील पशुधनावरील लम्पी रोगाची बाधा कमी होण्याचे नाव घेण्यात तयार नाही. नव्याने 475 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, मृतांच्या संख्येत 25ने वाढ झाली आहे. दुसरीकडे राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या शेतकऱयांना 27 लाख 17 हजारांची मदत मंजूर केली असून, यातील काही रक्कम शेतकऱयांना देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम दोन दिवसांत अदा करण्यात येणार आहे.
नगर जिह्यात लम्पी रोगामुळे पशुधनासह शेतकरी मेटाकुटीला आले आहेत, तर पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांची झोप उडाली आहे. दररोज लम्पीबाधितांची संख्या वाढत आहे. नव्याने 475 प्रकरणे समोर आली आहेत. जिह्यात 209 गावांत लम्पी पीडित जनावरे असून, बरे झालेल्या जनावरांची संख्या 3 हजार 339 आहे.
5 किलोमीटरच्या परिघात असणाऱया गावांची संख्या 1 हजार 86 झाली असून, या ठिकाणी असणाऱया 13 लाख 40 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर, आतापर्यंत 296 जनावरांचा लम्पीत बळी गेला आहे. जनावरे मृत पावलेल्या शेतकऱयांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मोठय़ा जनावरांसाठी प्रत्येकी दहा, तर लहान वासरे यांना प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे 3 लाख 70 हजारांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे.
यासह राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एक वर्षापुढील गाय मृत झाल्यास 30 हजार, एक वर्षावरील बैल मृत झाल्यास 25 हजार आणि एक वर्षाच्या आतील गाय आणि बैल मृत झाल्यास प्रत्येकी 16 हजार याप्रमाणे मदत देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने 23 लाख 47 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले असून, काही अनुदान शेतकऱयांना देण्यात आले आहे. उर्वरित लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.
थेट खात्यावर जाणार पैसे
लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना झेडपी आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने मदत देण्यात येणार आहे. यातील मदतीची रक्कम थेट शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच, आरोग्य विभागाकडील 14 रुग्णवाहिका पशुसंवर्धन विभागाच्या मदतीला देण्यात आल्या आहेत.
शेवगावात लसीकरण झालेल्या जनावरांनाही लागण
शेवगाव तालुक्यात जनावरांच्या लम्पीसदृश आजाराची संसर्गजन्य साथ वाढत असून, या आजाराने आतापर्यंत 5 जनावरांचा बळी घेतला आहे. लसीकरण झालेल्या जनावरांतही लम्पीसदृश आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने शेतकऱयांच्या चिंतेत अधिक भर पडत चालली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 143 जनावरे बाधित आढळली असून, यापैकी 69 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.



























































