थेंबापासून बादलीभर चहा-कॉफी सामावणाऱ्या कपांचे अनोखे दालन, शिल्पकार प्रमोद कांबळेंचे संकलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या दोन इंचाचा म्हणजे चार सेंटिमीटर आकाराचा छोटेखानी कप पाहून आश्चर्य वाटताना त्याचवेळी तब्बल 20 लिटर चहा वा कॉफी बसू शकेल, असा भव्य कप (मग) पाहून अचंबित व्हायला होते. पण, ही किमया साधली आहे नगरचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी. हे कप त्यांनी देश-विदेशातून संकलित केले आहेत. अशा तब्बल अडीच हजारांवर कपांचे दालन त्यांनी सावेडीतील गुलमोहोर रस्त्यावरील त्यांच्या आर्ट गॅलरीत उभारले आहे. हे दालन नगर शहराच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने नवे आकर्षण ठरणार आहे.

प्रमोद कांबळे यांची चित्रे व शिल्पकृती देशविदेशात प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त 1997 साली जुन्या बसस्थानकाजवळील महापालिकेच्या महावीर कलादालनात त्यांनी रेखाटलेली देशातील नामवंत पाचशे व्यक्तिमत्त्वांची पेन्सिल चित्रे अजूनही कायम आहेत. त्यांनी तयार केलेल्या प्राणिशिल्पांचे दिवगंत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी कौतुक केले आहे. स्वतः कलात्मक कलाकृती घडवणारे कांबळे कलात्मक साहित्य व वस्तूंच्या संकलनातही गोडी ठेवून आहेत. याच आवडीतून त्यांनी देश-विदेशातून कप जमा केले आहेत.

कोठेही भटकंती करायला गेल्यावर तेथून चांगले काय आणता येईल, या विचारांतून कांबळे पुस्तके व अनेकविध वस्तू आणतात. कपांचे संकलनही त्यांनी देशात विविध ठिकाणी फिरताना आणि युरोप व अमेरिकेतून केले आहे. कांबळे यांच्या या आवडीमुळे त्यांच्या मित्रांनीही त्यांच्यासाठी अनेक ठिकाणांहून असे कप त्यांना भेट दिले आहेत. विशेषतः नगरमधील कोहिनूर वस्त्र्ादालनाचे प्रमुख दिवंगत प्रदीप गांधी यांनीही अनेक वेळा परदेशातील प्रवासावेळी कांबळे यांच्यासाठी तेथील अनेकविध कप संकलित करून त्यांना भेट दिले आहेत.

प्रमोद कांबळे यांचे स्वतंत्र कप दालन पाहण्यासाठी रसिकांची गर्दी झाली होती. आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह नगरमधील साहित्य, कला, समाजकारण, संगीत आदी क्षेत्रांतील अनेकांनी या दालनास भेट देऊन या अनोख्या संग्रहाचे कौतुक केले आहे.

हिंदुस्थानातील पहिले दालन

त्यांच्या या संग्रहात दोन इंचाच्या छोटय़ा कपापासून 20 लिटर क्षमतेच्या भव्य कपाचा समावेश आहे. धातू, सिरॅमिक, काच, टेराकोट, पत्रे, कागद, पितळी, मेटल, चिनी माती, लेसर अशा अनेकविधी प्रकारांतील या कपांपैकी काहींवर ज्येष्ठ साहित्यिकांचे फोटो, काहींवर साहित्य रचनांचे लिखाण, काहींवर अनेकविध चित्रे, कार्टून्स आहेत. तर, काहींवर नामवंत कलावंत व साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुमारे अडीच हजारांवर या कपांचे हे वैशिष्टय़पूर्ण दालनात कदाचित हिंदुस्थानातील पहिले असे दालन असावे, असा दावाही प्रमोद कांबळे यांनी केला आहे.