ग्रामपंचायतीचा गाळा खाली करण्यासाठी विधवा महिलेला धमकी; सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायतीच्या मालकीचा गाळा खाली करावा यासाठी विधवा महिलेला धमकी दिल्याप्रकरणी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंचांनीही फिर्याद दिली असून, दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच शरद भाऊसाहेब बोठे (रा. वाळकी) व ग्रामविकास अधिकारी अप्पासाहेब मुरलीधर आबुज (रा. सारोळा आडवाई, ता. पारनेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सुवर्णा राजधर भालसिंग (रा. वाळकी) यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुवर्णा भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या गाळा क्र. 38मध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे मुलांचे खासगी क्लासेस घेत होत्या. बुधवारी सकाळी 10.30 वाजता गाळ्यासमोर सरपंच शरद बोठे आणि ग्रामविकास अधिकारी अप्पासाहेब आबुज आले व त्यांनी ‘हा गाळा ग्रामपंचायतीचा आहे. तो तातडीने खाली करा,’ असे सांगितले. तेव्हा भालसिंग यांनी ‘गाळ्याचे भाडे आपण नियमित भरत असून, या गाळ्यासाठी सन 2003मध्ये आपण 25 हजार रुपये अनामत रक्कम भरलेली आहे. तेव्हापासून गाळा ताब्यात आहे. तो खाली करणार नाही,’ असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचे दीर धर्मराज भालसिंग व सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, ग्रामविकास अधिकारी अप्पासाहेब आबुज यांनीही भालसिंग यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीमध्ये कामकाज करीत असताना सरपंच शरद बोठे यांनी सांगितले, ‘ग्रामपंचायतीच्या गाळा क्र. 38ला बाळासाहेब केशव भालसिंग व संतोष बाळासाहेब भालसिंग यांनी कुलूप लावलेले आहे.’ तेव्हा आपण समक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे कुलूप लावलेले दिसून आले.

आजूबाजूला चौकशी केली असता, ते कुलूप बाळासाहेब भालसिंग व संतोष भालसिंग यांनीच लावल्याचे समजले. त्यामुळे या दोघांनी ग्रामपंचायतीचे कर्तव्य पार पाडण्यास अटकाव केला. त्यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब भालसिंग व संतोष भालसिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.