दिलासा… विक्रमी पावसामुळे अद्याप टँकरची मागणी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

फेब्रुवारी महिना सुरू झाला असला, तरी जिल्हा प्रशासनाकडे अद्याप एकाही गावातून पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची मागणी आलेली नाही. यंदा झालेल्या विक्रमी पावसामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे मागील वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणार्‍या नागरिकांना यंदा मात्र दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यानंतर काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका असल्यामुळे त्या दृष्टीनेही प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.

जिल्ह्यात 2018 मध्ये जून ते ऑक्टोबर या काळात अवघ्या 70 टक्के सरासरी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात 2002 पासून पडणार्‍या पावसाची सरासरी आकडेवारी पाहता, त्या तुलनेत 2018 मध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारी सर्वांत कमी होती. अल्प पावसामुळे भूजल पातळीतही कमालीची घट झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली व सप्टेंबर 2018 पासूनच टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. मे 2019 पर्यंत तर टँकरची संख्या 893 वर गेली होती. टँकरची ही संख्या आतापर्यंतची सर्वात उच्चांकी संख्या ठरली आहे.

यंदा मात्र पिण्याच्या पाण्याच्या चिंतेतून अनेक गावांची सुटका झाली आहे. कारण 2019 मध्ये जून ते ऑक्टोबर या काळात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. त्यातच नोव्हेंबर महिन्यातही जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धरणांसह गावातील नद्या, ओढे, बंधारे तुडूंब भरून वाहत होते. या विक्रमी पावसाने जिल्ह्यातील बहुतांश गावांतील उन्हाळ्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा तर फेब्रुवारी महिना सुरू झाला असतानाही अद्यापही एकाही गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आलेली नाही; तसेच टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्तावदेखील जिल्हा प्रशासनाकडे आलेले नाहीत. अद्यापही एक ते दीड महिना टँकर सुरू करण्याची वेळ येणार नाही, असा जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांचा अंदाज आहे. त्यानंतर काही गावांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आल्यास त्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाने ऑक्टोबर 2019 नंतर जिल्ह्यातील भूजल पातळीबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ज्या तालुक्यांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत घट दिसत आहे, अशा तालुक्यांतील परिस्थिती लक्षात घेऊन त्या तालुक्यांमधील कोणकोणत्या गावात आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची गरज भासू शकते, याचा अंदाज बांधला जात आहे. या विभागाने मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यातील एकाही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा अंदाजही वर्तवला आहे. त्यामुळे एप्रिलनंतर काही गावांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने तेथील नागरिकांना कशा पद्धतीने पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करता येईल, याचे नियोजनही प्रशासकीय पातळीवर केले जात आहे.