नगर जिल्ह्यातील बालकांना ‘व्हायरल’चा ताप, वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांनी चिंता वाढविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूने डोके वर काढलेले असतानाच आता लहान बालकांना ताप, सर्दी, खोकला या आजारांनी वेढले आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर झालेला दिसत आहे. यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱया लाटेची भीती आरोग्य क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र, सध्या नगर शहरासह जिह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. आता अचानक वातावरणात बदल झाल्याने लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला आदी आजार बळावले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात बालरुग्णांची संख्या वाढली आहे. जिह्यात कोरोनाचे संकट कायम असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱयावरील कोरोनाची चिंता कमी झालेली दिसून येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. दिवसभर कडक ऊन असते आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा असतो; तसेच अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या बदलत्या विचित्र वातावरणाचा परिणाम आरोग्यावर झालेला दिसून येत आहे. सर्दी, खोकला, हिवताप अशा आजारांचे प्रमाण वाढले आहे. तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांमध्येही या आजारांचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांनी शहरातील बालरुग्णालये गर्दीने खचाखच भरली आहेत. बदलत्या वातावरणाने साथीचे आजार बळावले आहेत. तापाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. रुग्णालयात अशा बालरुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

नगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यासोबतच रस्त्यावरील खड्डे, तुंबलेली गटारे, पाण्याची डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सर्दी, अंगदुखी, खोकला, ताप, प्लेटलेट कमी असणे असे रुग्ण आता वाढीस लागले आहेत. डेंग्यू अथवा साथीचे आजार होऊ नये म्हणून गावातील गटारे, नाल्या वाहते करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे मनपा प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे.

सध्या पाऊस, ऊन आणि दमट हवामान असे वातावरण आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. ताप, सर्दी, खोकला या आजारांनी लहान मुले आजारी पडत आहेत. नगर शहराचा कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.- डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा शल्यचिकित्सक.