
नगर जिल्हा परिषदेत यापूर्वी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देतो म्हणून काही तोतया एजंट लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचे प्रकार झालेले आहेत. असाच एक प्रकार पुन्हा जिल्हा परिषदेत घडला. जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे, कडबाकुट्टी यंत्र मिळवून देतो, असे सांगून एका तोतया इसमाने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्याकडून 10 हजार रूपये घेऊन पोबारा केला. काही वेळाने संबंधित शेतकऱ्याने कृषी विभागात विचारणा केली. मात्र, अशा नावाचा कोणी कर्मचारी आपल्याकडे नाही. शिवाय कोणत्याही योजनेसाठी असे पैसे लागत नाहीत, असे कृषी विभागाने स्पष्ट करताच आपण फसवलो गेल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले.
बुधवारी दोन वाजण्याच्या सुमारास संबंधित शेतकऱ्यासह दोघेजण कृषी विभागात विचारपूस करत आले. जिल्हा परिषदेचा कर्मचारी असल्याचे सांगून एका इसमाने आमच्याकडून काही वेळापूर्वी याच इमारतीत 10 हजार रूपये घेतले. पॅसेजमध्ये सीसीटीव्ही आहेत म्हणून त्याने स्वच्छतागृहात बोलावून पैसे घेतले. तुम्ही येथेच थांबा काही वेळात फाईल घेऊन येतो म्हणून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहिली; परंतु तो आला नाही. कृषी विभागातून कडबाकुट्टी योजना चालते, म्हणून तुमच्याकडे आलो, असे तो शेतकरी कर्मचाऱ्यांना सांगत होता.
दरम्यान, येथील कोणत्याही योजनेसाठी पैसे लागत नाही, असे कृषीतील कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला सांगितले. त्यानंतर आपण फसवलो गेल्याचे त्या शेतकऱ्याच्या लक्षात आले. हा शेतकरी पारनेर तालुक्यातील जामगाव येथील आहे. संबंधित तोतया इसमाची व या शेतकऱ्याची फोनवरून ओळख झाली. कडबाकुट्टीसाठी 25 ते 40 हजार रूपये लागतात; परंतु 10 हजार रूपयांत कडबाकुट्टी मिळतेय. शिवाय जिल्हा परिषदेचा कर्मचारी असल्याचे सांगतोय म्हटल्यावर खात्रीने योजनेचा लाभ होईल, असे समजून या शेतकऱ्याने तोतयाला 10 हजार रूपये दिले.
























































