रुध्दा गावच्या भूमिपुत्राने बनविला चांद्रयान -2 चा पार्ट, जगात फडकावला झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर तालुक्यातील रुध्दा या गावचे मुळचे रहिवाशी असलेले उद्योजक पाटलोबा केंद्रे यांचा मोठा मुलगा सतीश केंद्रे संचालक असलेल्या ‘निस्सु डायनॅमिक रेडियटर्स’, पुणे या कंपनीकडून इस्रोने चांद्रयान -2 ला लागणारा रेडियटर्स बनवुन घेतला. तालुक्याच्या ठिकाणापासुन जवळपास सहा किलो मीटर अंतरावर असणाऱ्या रुद्धा या छोट्याशा खेडेगावचे रहिवाशी असलेले पाटलोबा केंद्रे यांनी लष्करात देशाची सेवा केली आहे. साधारणता त्यांनी 40 वर्षापुर्वी सैन्य दलातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील हडपसर परिसरात वेल्डिंग वर्कशॉप हा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. या छोटाशा रोपट्याचे पुढे कालांतराने मोठ्या कंपनीत रूपांतर झाले. ‘निस्सु डायनॅमिक रेडियटर्स’ या नावाने तर दुसरी ‘मोहन एटरप्राईजेस’ या नावाने कंपनी सुरू करण्यात आली. तसेच त्यांचा ‘श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना’ देखील पुणे येथे आहे.

पाटलोबा केंद्रे यांचे जेष्ठ चिरंजीव सतीश पाटलोबा केंद्रे संचालक असलेली ‘निस्सु डायनॅमिक रेडियटर्स’ कंपनी देशातच नाही तर संपूर्ण जगात छोट्या मोठ्या कार पासुन ते मोठ मोठे जहाज, रेल्वे, ट्रक, जेसीबी, जनरेटर इत्यादीसाठी लागणारे रेडियटर्स एक्सपोर्ट करीत असते. असाच एक भला मोठा पाचशे किलोवॅटचा रेडियटर्स इस्रोने निस्सु डायनॅमिक रेडियटर्स कंपनीकडून चांद्रयान -2 साठी बनवून घेतला.

22 जुलै रोजी चांद्रयान – 2 ने आकाशात यशस्वी झेप घेतली असून लवकरच हे यान चंद्रावर पोहचणार आहे. या यानासोबत सतीश केंद्रे संचालक असलेल्या निस्सु कंपनीचा रेडियटर्स देखील चंद्रयान -2 सोबत चंद्रावर पोहचणार आहे. ही एक रुध्दा ग्रामस्थांसाठी तसेच अहमदपूर तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कंपनीला आणि कंपनीचे संचालक सतीश केंद्रे यांना शुभेच्छा दिल्या.