
आफ्रिकेचा सलामीवीर मारक्रमने कालचा सामना पळवला. आफ्रिकेच्या या लुटीत कप्तान बव्हुमा, ब्रिझके, ब्रेव्हिस नामक मंडळीचा सहभाग होता. हिंदुस्थानचे गोलंदाज आजच्या सामन्यात कमी पडतील अशी अपेक्षा होतीच. कारण पहिल्या सामन्यातसुद्धा जय-पराजयातला फरक जेमतेमच राहिला होता आणि आपली गोलंदाजी ठणठणीत खेळपट्टय़ांवर प्रतिस्पर्ध्याला रोखू शकत नाही असा इशारा तेव्हाच आपल्याला मिळाला होता.
मारक्रमने दहा चौकार आणि चार षटकारांचा गोंधळ घातल्यानंतर त्याच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी छान आक्रमक फलंदाजी केली. ब्रिझके आणि ब्रेव्हिसने सातत्य दाखवलंय. त्यात भर पडली ती बव्हुमाची आणि आपली साडेतीनशेपार धावसंख्या तोकडी ठरली.
त्यापूर्वी आपली वीरूची जोडी चमकून गेली! म्हणजे विराट अन् ऋतुराजची जोडी! ऋतुराजने फक्त 77 चेंडूंत बारा चौकार अन् दोन षटकारांसह पहिलं वन डे शतक झळकवलं. सध्या आपल्या संघातल्या चौथ्या क्रमांकाची गाथा डोळ्याखालून घातली तर ऋतुराजच्या शतकाचं महत्त्व सहज लक्षात येऊ शकेल. ऋतुराजचं स्वागत यान्सनने अप्रतिम बाऊन्सरने केलं, पण त्याला एक अंधा चौकार मिळाला. आणि आणखी एका तितक्याच तिखट बाऊन्सरवर मिळाला काणा षटकार! त्यानंतर मात्र त्याचे कट, पुल, स्वीप आणि ड्राइव्ह फारच आश्वासक होते.
विराट तर एखादा पॉपकॉर्न तोंडात टाकण्याच्या सहजतेने शतकं ठोकतोय! एका जमान्यात पोल वॉल्टर सर्जी बुबका प्रत्येक प्रयत्नात इंचा-इंचाने नवा विक्रम नोंदवायचा! आज विराट त्याच्याच पावलावर पाऊल टाकताना दिसतोय! आपला विक्रम अधिकाधिक उंचीवर नेतोय. विराटचे ड्राइव्हज, कट, पुल खणखणीत तर होतेच, पण त्याचे ग्लान्सेस अतिशय नजाकतभरे होते. रोमांचित कारणारे होते! विराटने बॉशला मारलेला ऑन ड्राईव्ह तर केवळ ‘आहा’ होता! वीरूने 195 धावांची वेगवान भागीदारी केली. मोठय़ा फटक्यांप्रमाणेच एकेरी-दुहेरी धावांवरही त्यांनी भर दिला. विराटच्या शतकात तब्बल 45 एकरी धावा होत्या! त्यामुळेच साडेतीनशेपार धावसंख्या दिसू शकली. अर्थात, यात राहुलच्या फटकेबाज अर्धशतकाचाही आवर्जून उल्लेख करावाच लागेल.
यशस्वीचं काय बिनसलंय! कालच्या सामन्यात त्याने केलेली फलंदाजी पाहता वाटलं, बाद होण्याचा त्याने अट्टहास केला! महाराजच्या पहिल्याच षटकात स्वीप, उलटा स्वीप अन् मग यान्सनच्या ऑफ स्टम्पवरील बाऊन्सरला पुल करण्याच्या नादात सोप्पा झेल! विराटच्या साथीने फलंदाजी करण्याचा आनंद काय असतो हे ऋतुराजने उलगडून सांगितलं. यशस्वी, एका फटक्यात शतकाची पेटी वाजवता येत नाही. पेटीचा बाज सातही सूर लागल्यानंतरच श्रवणीय बनतो, रोमारोमांत भिनतो! तुझी शैलीदार शतकं आम्ही पाहिली आहेत. त्यांचीच अपेक्षा आहे.
अर्थात, आफ्रिकेची कालची फलंदाजी पाहून मालिकेच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आपल्याला हजार धावा कराव्या लागतील असं वाटतंय!



























































