एम्समधील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोना महामारीच्या काळात देशातील सर्वात मोठे रुग्णालय असणाऱ्या दिल्लीतील एम्स रुग्णालयातील परिचारिका (नर्स) बेमुदत संपावर गेल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात दाखल होण्यासाठी इतर राज्यातून येणाऱ्या रुग्णांना संपाचे कारण सांगत रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या देखभालीसाठी कोणीही नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. तसेच नर्सअभावी अनेक रुग्णांवर उपचार होऊ शकत नाहीत.

सहाव्या वेतन आयोगाच्या तरतूदी लागू कराव्या आणि कंत्राटी पद्धतीने भरती बंद करावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासह इतर काही मागण्यांसाठी परिचारिकांनी बेमुदत संप पुकारला आहे. सुमारे पाच हजार परिचारिका सोमवार दुपारी अचानक संपावर गेल्या. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे हाल झाले.

कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांनी संप करणे दुर्दैवी असल्याचे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे सांगितले. पारिचारिकांनी अचानक पुकारलेल्या बेमुदत संपाने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे परिचारिकांनी संप मागे घेत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन गुलेरिया यांनी केले आहे.

इतर राज्यातून उपचारासाठी एम्समध्ये येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. संपाचे कारण सांगत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत त्यांना रुग्णालयाबाहेरच ताटकळत थांबावे लागत आहे. तसेच शस्त्रक्रियांसाठी आलेल्या रुग्णांवरही परिचारिका नसल्याने पुढील उपचार होऊ शकत नाहीत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची देखभाल करण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

एम्स देशातील सर्वात मोठे रुग्णालय असून या रुग्णालयात उपचारासाठी इतर राज्यातून रुग्ण येतात. त्यात यकृताचे आजार, कर्करोग, हृदयरोग असे आजार झालेल्यांचा समावेश असतो. परिचारिकांच्या संपामुळे इतर राज्यातून आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. या संपामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.