सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय, हवाई दलाला मिळणार 83 तेजस लढाऊ विमाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवाई दलाला लवकरच 83 तेजस लढाऊ विमाने मिळणार आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. या बैठकीत तेजस विमानांच्या 48 हजार कोटींच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी देण्यात आली.

पाकिस्तान व चीनकडून सीमेवर तणाव वाढवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियातून या निर्णयाची माहिती दिली. सर्व लढाऊ विमाने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमार्फत (एचएएल) तयार केली जाणार आहेत. हा निर्णय संरक्षण क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंगला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने ‘गेमचेंजर’ ठरेल. एचएएलने ‘लाईटकॉम्बॅट एअरक्राफ्ट 1ए’ तेजस लढाऊ विमाने तयार करण्यासाठी नाशिक आणि बंगळुरूमध्ये व्यवस्था उभारली आहे.

संरक्षण क्षेत्रातील निर्मितीला चालना देण्यासाठी हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो, असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले. संरक्षण मंत्रालयाने याआधी 40 लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भात करार केला आहे. त्यात या 83 तेजस विमानांची भर पडणार आहे.

60 टक्के स्वदेशी उपकरणे वापरणार

तेजस लढाऊ विमाने बनवण्यासाठी 60 टक्के स्वदेशी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यातील बहुतांश उपकरणांचा देशात यापूर्वी कधीही उपयोग झालेला नाही. या विमानांच्या निर्मितीतून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पुढील सहा ते सात वर्षांत सर्व 83 तेजस विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

तेजसची काही वैशिष्टय़े

  • हे विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र सोडू शकते. यात अॅण्टीशिप क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेटही लावले जाऊ शकते.
  • हिंदुस्थानात विकसित केलेले हलके आणि विविध कार्ये करणारे (मल्टीरोल) लढाऊ विमान.
  • हवाई दलाबरोबरच नौदलाला उपयोगी पडू शकते. या विमानाने विमानवाहक जहाजावरून टेकऑफ आणि लॅण्डींगची चाचणी एकाच उड्डाणात यशस्वी केली आहे.