उड्डाणानंतर एक इंजिन बंद पडलं; दिल्ली-मुंबई विमानाचा यू टर्न, ‘एअर इंडिया’तील प्रवाशांचा जीव टांगणीला

दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे दिल्लीत तातडीने लँडिंग करण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचे एक इंजिन बंद पडल्याचे कळताच पायलटने विमान तातडीने पुन्हा दिल्लीकडे वळवले आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग केले.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या AI 887 (Boeing 777, VT-ALS) या विमानाने दिल्लीहून मुंबईसाठी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या बाजूचे इंजिन बंद पडले. हे कळताच पायलटने प्रसंगावधान राख विमान पुन्हा दिल्लीकडे वळवले आणि 6 वाजून 52 मिनिटांनी दिल्ली विमानतळावर उतरवले. विमान पुन्हा दिल्लीकडे वळल्याने प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता.

दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एअर इंडियाने दुसरे बोईंग विमान उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर प्रवाशांना विमानतळावर अल्पोपहार देण्यात आला. अखेर सकाळी दहाच्या सुमारास पर्यायी विमान प्रवाशांना घेऊन मुंबईकडे मार्गस्थ जाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमानाच्या इंजिनमध्ये कोणत्या कारणाने बिघाड झाला याचा तपास करत आहे.

KLM एअरलाईन्सच्या विमानात बॉम्बची धमकी

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी मध्यरात्री दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अ‍ॅमस्टरडॅमहून हैदराबादला येणाऱ्या KLM एअरलाईन्सच्या विमानाबाबत मध्यरात्री 12 च्या सुमारास एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला. धमकी मिळाल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास विमान सुरक्षितपणे हैदराबादमध्ये उतरवण्यात आला. विमान उतरवल्यानंतर सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलप्रमाणे विमान आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. सुदैवाने कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.