एअर इंडियाचे विमान घसरले; मुसळधार पावसात अपघात; प्रवाशांचा उडाला थरकाप

अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटना ताजी असतानाच सोमवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले. सकाळी कोचीहून मुंबईत आलेल्या विमानाने लॅण्डिंग केले. मात्र मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून बाहेर सरकले. नंतर विमान एका जागेवर थांबेपर्यंत वैमानिकासह विमानतळ कर्मचाऱयांची पाचावर धारण बसली. या अपघाताने प्रवाशांचा प्रचंड थरकाप उडाला. तसेच विमानाचे तीन टायर फुटले आणि इंजिनच्या काऊलिंगचे व पंखाच्या मागील बाजूस असलेल्या फ्लॅपचे मोठे नुकसान झाले.

सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी हा अपघात घडला. शहरात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचा विमानसेवेवर परिणाम झाला. याचदरम्यान एअर इंडियाचे एआय-2744 विमान धावपट्टीवरून घसरले. विमानाने धावपट्टी क्रमांक 09/27 वर लॅण्डिंग केले होते; परंतु वेग कमी करताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि 16 ते 17 मीटर पुढे जाऊन थांबले. विमान धावपट्टीवरून घसरल्याचे कळताच आतील प्रवाशांची प्रचंड घाबरगुंडी उडाली. काही प्रवाशांनी संभाव्य दुर्घटनेच्या भीतीने मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडाही सुरू केला. त्यामुळे विमानतळ कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणांचीही धांदल उडाली. अपघातात विमान इंजिनच्या काऊलिंगचे तसेच पंखाच्या मागील बाजूस असलेल्या फ्लॅपचे नुकसान झाले. तसेच पंखाच्या एका बाजूला आणि नोज व्हीलच्या भागात गवत व चिखलदेखील उडाल्याचे पह्टो सोशल मीडियात व्हायरल झाले.

मुख्य धावपट्टी काही काळ बंद

विमानाच्या घसरणीची घटना घडताच सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. विमानतळावरील आपत्कालीन मदत पथकांनी तातडीने विमानाच्या दिशेने धाव घेतली आणि सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर उतरवले. सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्रवक्त्यांनी दिली. अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव 09/27 ही मुख्य धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. या काळात 14/32 या पर्यायी धावपट्टीवरून विमानांची वाहतूक सुरू ठेवली.