विमानात तांत्रिक बिघाड, आठ तासांनंतर यू-टर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा दिल्लीला परतल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, हे विमान तब्बल 8 तासांपेक्षा जास्त वेळ हवेत होते. विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर वैमानिकाने सुरक्षेची काळजी घेत विमान दिल्लीच्या दिशेने वळवले. सुदैवाने विमानाचे दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले.

एअर इंडियाचे ए 1173 हे बोइंग 777-330 ईआर विमान दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोसाठी रवाना झाले होते. विमान हवेत असतानाच अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. तोपर्यंत विमानाने तब्बल 8 तासांचा प्रवास पूर्ण केला होता. या विमानात सुमारे 230 प्रवासी होते.

एअर लाइन्सच्या कडक सुरक्षा मानकांनुसार विमानाची तांत्रिक तपासणी केली जाईल. अचानक मार्ग बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्याबद्दल एअरलाईन्स दिलगिर आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे.