फुकेत दिल्ली एअर इंडियाच्या पायलटच्या डोप चाचणीत आढळला गांजा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ‘AI2379’ विमानाचे मुख्य पायलटच्या दुसऱ्या डोप चाचणीत गांजाचे सेवण केल्याचे समोर आले आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच हे विमान अचानक सुमारे ३०० फूट खाली आले होते, ज्यामुळे निर्माण झालेल्या टर्ब्युलन्समध्ये किमान १७ प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले होते.

४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांची सायकोअ‍ॅक्टिव्ह पदार्थांची सक्तीची तपासणी करण्यात आली होती. मुख्य वैमानिकाच्या प्राथमिक चाचणीनंतर अधिक स्पष्टतेसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या दुसऱ्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले आहे.

४ ऑगस्ट रोजी एअरबस A320 विमान फुकेतहून दिल्लीला येत असताना हवेत असतानाच अचानक सुमारे ३०० फूट खाली आले. या विमानात ३ लहान मुलांसह १३७ प्रवासी आणि ८ कर्मचारी (२ वैमानिक आणि ६ केबिन क्रू) असे एकूण १४५ जण प्रवास करत होते. या घटनेत ४ केबिन क्रू सदस्यांसह किमान १७ जण जखमी झाले. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, टर्ब्युलन्स सुमारे पाच मिनिटे सुरू होता. काही कर्मचाऱ्यांना पाठीच्या आणि मानेच्या गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यानंतर विमानावर नियंत्रण मिळवण्यात आले आणि ते दिल्लीत सुरक्षित उतरले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची गांभिर्याने दखल घेत, ‘विमान अपघात तपास ब्युरो’ने (AAIB) या प्रकरणाची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. तपासणीसाठी विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) ताब्यात घेण्यात आला आहे.