
अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा फटका हवाई वाहतुकीला बसत आहे. वाढता खर्च आणि कमी झालेल्या नफ्यामुळे एअर इंडिया आता प्रवाशांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. यासाठी विमान कंपनीने काही महत्त्वाचे बदल करण्याचे ठरवले आहे. एअर इंडियाने प्रवाशांना स्वस्त तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी देशांतर्गत आणि कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जेवणाचा पर्याय आता बंधनकारक नसेल. त्यामुळे जेवणाविना प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. या निर्णयामुळे प्रवाशांना आधीच्या तुलनेत आता तिकीट कमी किमतीत मिळू शकेल.
एअर इंडिया अनबंडलिंग (सुविधांना वेगळे ठेवणार) प्रक्रिया लागू करणार आहे. यामुळे प्रवाशांना अनेक वेगवेगळय़ा प्रकारच्या सुविधा मिळू शकतील. याचा थेट परिणाम तिकिटाच्या किमतीवर दिसेल. जे प्रवासी तिकीट बुक करताना जेवणाचा पर्याय स्वीकारणार नाहीत. त्या प्रवाशांना तिकीट स्वस्त मिळेल. हा बदल पुढील एक ते दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया केवळ इकोनॉम क्लाससाठी नव्हे तर बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठीही बचत करण्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. एअरलाइन लाऊंज अॅक्सेसलाही तिकिटापासून वेगळे करण्याचा विचार एअर इंडियाकडून केला जात आहे. 28 फेब्रुवारीपासून एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (एटीएफ) च्या किमतीत मोठी वाढ झाल्याने आणि अमेरिकन डॉलरपुढे रुपयांची घसरण झाल्यामुळे हवाई वाहतूक करणे महाग ठरत आहे.
अमेरिकन एअरलाइन स्पिरिट बंद पडली
होर्मुज संकट अधिक गडद झाल्यामुळे कच्चे तेल प्रचंड महाग झाले आहे. एटीएफ इंधनाच्या किमती वाढल्याने अमेरिकेचे एअरलाइन स्पिरिट बंद पडली आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे एअरलाइन स्पिरिटला आपला व्यवसाय बंद करावा लागला आहे. 34 वर्षांनंतर एअरलाइनने आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. इंधन दरवाढीमुळे ही कंपनी तोटय़ात जात होती. इंधनाच्या वाढलेल्या किमती न झेलू शकल्याने कंपनी बंद पडली आहे. यामुळे 17 हजार लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
मेट्रो विमानतळावर लाऊंज संचालक सरासरी 1100 ते 1400 रुपये प्रति प्रवासी चार्ज केले जाते. अनेक बिझनेस प्रवासी थेट उड्डाणावेळी विमानतळावर पोहोचतात. त्यामुळे ते लाऊंजचा वापर करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना विना लाऊंज सुविधेचे स्वस्त तिकीट खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो.
150 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सची कपात
महाग एटीएफ आणि पाकिस्तानसह काही देशांनी आपल्या हद्दीतून विमानांना केलेल्या प्रवेशबंदीमुळे विमान कंपन्यांना कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी एअर इंडियाने मे महिन्यात जवळपास 150 आंतरराष्ट्रीय उड्डाणांची कपात केली आहे. ही कपात दिल्ली, मुंबईसह अहमदाबाद आणि अन्य विमानतळावरून अमेरिका, पॅनडा आणि युरोपला जाणाऱ्या फ्लाइट्सचा समावेश आहे.

























































