
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील 17 शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावली असून त्यात मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, जालना, सांगली, कोल्हापूर, लातूर, नाशिक व सोलापूर या शहरांचा समावेश आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
मुंबईसह राज्यातील इतर शहरांतील प्रदूषण रोखण्याबाबत आमदार मंगलप्रभात लोढा आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईतील हवा शुद्ध करण्यासाठी वांद्रे-कलानगर, घाटकोपर, भांडुप, शीवमध्ये विंड ओग्मँटेशन ऍण्ड प्युरिफाइंग युनिट ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर उभारली आहे, असे लेखी उत्तरात नमूद केले.





















































