
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
हिंदुस्थान कधीही कोणाला फशी पडला नाही आणि कोणापुढे कधीही झुकला नाही, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अजेय भारत, अटल भाजपा’ असा नारा आज दिला. पक्षाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली त्यावेळी मोदी बोलत
होते.
भाजप कायम आपल्या सिद्धांतानुसारच वाटचाल करील, अशी ग्वाही देऊन मोदी म्हणाले की, अटलजींनी पक्षाचे विचार, संस्कार आणि नेतृत्वाला नवी उंची दिली. त्यांच्या महानिर्वाणामुळे आमचा ‘सूर्य’च जणू लोपला आहे. मात्र आमच्यासारखे तारे पक्षाच्या विचारधारेला प्रकाशाच्या दिशेने पुढेच नेतील.
आम्ही सत्तेला ‘सिंहासन’ मानत नाही. सत्तेच्या आसनाला जनतेच्या सेवेचे साधन मानतो, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
2014 पेक्षा अधिक जागा भाजप जिंकेल – अमित शहा
विरोधकांची ‘महाआघाडी’ असफल ठरेल, असे सांगतानाच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 2014 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा ठाम विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केला. विरोधकांचे राजकारण देशासाठी हानीकारक आहे, असा आरोपही त्यांनी केला.
विरोधकांकडे ना नेता, ना नीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखणे हा एकमेव अजेंडा विरोधकांचा आहे. त्यांच्याकडे ना नेता आहे, ना नीती आहे, अशा शब्दांत भाजप नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीत विरोधकांवर हल्ला चढवला. विरोधी पक्ष हे हताश झालेले आहेत, असेही ते म्हणाले.





























































